मराठवाड्यात काल जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांमध्ये शनिवारी रात्री ८:३० वाजता मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काहीकाळ वीजही गुल झाली होती.
परतूर तालुक्यात मार्चमध्ये उन्हाची तीव्रता वाढवत असताना अचानक शनिवारी रात्री विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन भाजीपाल्यासह काही पिकांना हा पाऊस लाभदायक ठरणार आहे, तर काही पिकांसह वीटभट्टी चालकांना हा पाऊस हानिकारकही ठरणार आहे.
हिंगोलीतही अवकाळी पावसाची हजेरीकळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा व परिसरात ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.
सध्या हळद काढणीची लगबग सुरू आहे. तर काही शेतकऱ्यांनी हळद शिजवून वाळवणीसाठी शेतात ठेवली आहे. यातच शनिवारी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांची हळद भिजली. पावसापासून हळद वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. मागील चार दिवसांपासून वातावरणातील बदल आणि हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे हळद झाकण्यासाठी मेनकापडाची खरेदी केली आहे. याचा आर्थिक भुर्दंडही शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, कुरूंदा भागात रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. .
मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच २९ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३० मार्च रोजीही पावसाने हजेरी लावली. या अवकाळीमुळे हळदीवर संकटाचे ढग निर्माण झाले असून, शेतात काढून टाकलेली हळद भिजू नये यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.