Join us

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने ९ हजार हेक्टर शेती खरडून गेली

By बिभिषण बागल | Published: July 25, 2023 1:45 PM

पावसाने पैनगंगा नदीसह ओढ्या, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरल्याने खरिपाची पिके तर वाहून गेलीच, शिवाय ८ हजार ९१२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. या जमिनीत सध्याही घोट्याइतके पाणी साचून आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे. नुसती पिकेच वाहून गेली नाहीत तर ८ हजार ९१२ हेक्टर क्षेत्रावरील जमीनच खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. त्यामुळे या जमिनीवर आता रबीची पिके घेणेही अवघड झाले आहे.

२१ आणि २२ जुलै रोजी जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाला. पहिल्या दिवशी ३६ आणि दुसऱ्या दिवशी १३ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतकऱ्यांची अक्षरश: दाणादाण उडविली. अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये ९०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. माहूर मंडळात तर २४ तासांत ३०० मिलिमीटर एवढा विक्रमी पाऊस झाला.

पावसाने पैनगंगा नदीसह ओढ्या, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरल्याने खरिपाची पिके तर वाहून गेलीच, शिवाय ८ हजार ९१२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. या जमिनीत सध्याही घोट्याइतके पाणी साचून आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. त्याचबरोबर रबी हंगामातही पेरणी करणे मुश्कील झाले आहे. दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा प्रशासनाने प्राथमिक अंदाज बांधला असून, त्यात हे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.

शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पंचनाम्यांना गती देऊन या शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे अन्यथा बळीराजा आणखी संकटात सापडेल. त्यामुळे सरसकट मदतीचीच मागणी पुढे येत आहे.

७५७ गावांना तडाखा दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील ७५७ गावांना तडाखा बसला आहे. या गावांतील २ लाख ४२ हजार ४५७ पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे हे नुकसान भरून कसे काढायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. 

टॅग्स :शेतीशेतकरीपाऊसपीकरब्बी