अलिबाग : रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका बसला असून, ३ हजार ७८४ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ९५५ महसुली गावे बाधित आहेत. अद्याप काही भागांत सरी कोसळत असल्याने नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या १५ दिवसांपासून दिवस दररोज सायंकाळच्या सुमारास अनेक भागात पाऊस पडतो. आतापर्यंत ३ हजार ७८४ हेक्टर क्षेत्रातील १० हजार ५९१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे. प्रत्यक्ष पंचनामे करताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते.
कापलेल्या भाताच्या लोंब्या पाण्यात भिजल्याने त्या खराब होतात, त्याच बरोबर चिखलातून भात कापणी करण्यासाठी जादा मनुष्य बळाची गरज भासत असते. अशा अनेक कारणाने शेतीतील अर्थकारणही बिघडत जाते, असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी शेतातचकापणी लांबणीवर पडत असल्याने जंगली पशुपक्ष्यांकडून होणाऱ्या नुकसानीतही वाढ होत आहे. दिवाळी सणाचा विचार केला असता आणि पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर शेतकऱ्यांना शेतातच दिवाळी काढावी लागण्याची शक्यता आहे.
लांबलेल्या परतीच्या पावसाने भातकापणी पुढे ढकलावी लागत आहे. हलव्या पिकाबरोबर गरवा भातपीकदेखील तयार झालेला आहे, पाऊस थांबताच सर्वांच्या भातकापण्या एकाच वेळी सुरू होतील, यामुळे मनुष्यबळ कमी पडणार आहे. कापणी झालेले भात शेतात ठेवता त्याची लगेचच मळणी करावी लागणार आहे. हे सर्व परिणाम लांबलेल्या परतीच्या पावसाने होणार आहेत. - रमेश पाटील, शेतकरी
अनेक भागात अद्याप पाऊस पडत आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात ९५५ महसुली गावे बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील ३ हजार ७८४ हेक्टर क्षेत्रातील १० हजार ५९१ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा हा अंदाज आहे. पावसाचा अंदाज पाहता या नुकसानीत वाढच होईल. जिल्ह्यातील सर्वच भागात नुकसानीचे प्रमाण आहे. - वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय अधिकारी