शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेला गुढीपाडवा हा पंधरा दिवसांवर आला आहे. या दिवसापासून शेतकऱ्यांच्या नवीन वर्षाला प्रारंभ होतो. गुढीपाडव्याला नवीन सालगडी ठेवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्यासाठी शेतकरी सालगड्याच्या शोधात शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा राज्यापर्यंत जात आहेत, तर बाजूच्या राज्यातील व जिल्ह्यातील शेतकरीही महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात सालगडी शोधत आहेत. वार्षिक सव्वा लाख रुपये पगार देण्यास तयार असूनही अनेकांना सालगडी मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे १५ ते २० एकर अथवा त्यापेक्षा अधिक शेती आहे, त्यांना घरातील व्यक्तींवर अवलंबून राहून शेती करणे शक्य नाही. त्यासाठी बाहेरचा सालगडी ठेवावा लागतो. हा सालगडी गुढीपाडव्याच्या सणादिवशी ठेवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी गुढीपाडव्याचा सण सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतात सालगडी ठेवण्यासाठी गावोगावी विचारणा करीत आहेत. अनेक शेतकरी शेजारच्या कर्नाटक व तेलंगणा राज्यातील सालगडी ठेवण्यास तयार आहेत. सव्वा लाख रुपये पगार देण्यास तयार असतानाही अनेकांना सालगडी मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे सध्या असलेल्या सालगड्याची मनधरणी करून त्यालाच पगार वाढवून देऊन पुन्हा कामावर ठेवण्याची कसरत सुरु आहे.
दरम्यान, उदगीरसह परिसरातील मोठे शेतकरी सालगड्यांचा शोध घेत आहेत. काही शेतकऱ्यांना सालगडी मिळाले असले तरी त्यांच्या अपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोठी अडचण झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गुढी पाडवा सण पंधरा दिवसांवर आला असल्याने शेतकरी सालगडी मिळविण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसून येत आहे.
वर्षाचा पगार अगोदर अन् धान्य...
अनेक शेतकरी सालगड्याने शेतीत काम करण्यास होकार दिल्यानंतर वर्षाचा पगार आगाऊ देण्यास तयार आहेत. तसेच सालगडी सांगितल्याप्रमाणे धान्य, डाळी, प्रसंगी हातउसने पैसे देण्याची तयारी ठेवत आहेत. एवढी मदत करुनही तो सालगडी संपूर्ण वर्षभर काम करेल की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असल्याचे पहावयास मिळत आहे.
शेती करणे कठीण...
मागील दोन वर्षांपासून सोयाबीनला भाव नसल्याने विक्रीविना घरीच साठवूण ठेवले आहे. त्यातच आता सालगडी ठेवण्याची वेळ आली आहे. त्यांचा पगार, मशागतीची कामे, निसर्गावर अवलंबून असलेली शेती, उत्पादित शेतीमालाला मिळत असलेला कमी भाव अशा अडचणींमुळे शेती आता परवडत नाही. त्यामुळे शेती बटई पद्धतीने देण्याचा विचार सुरु आहे. - ज्ञानेश्वर नारागुडे, शेतकरी, किनी य.