छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुका कृषी विभगाने शासनाच्या शेतकर्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली असून गावागावात होणार्या अखंड हरिनाम सप्ताहात जाऊन कृषी विभाग योजनांची जनजागृती करत आहे. या उपक्रमाबद्दल या विभागाचे विविध स्थरांवर कौतुक होत आहे.
खोलेश्वर संस्थान बोधेगाव खुर्द येथे पारंपारिक लोककलाकृतीच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह संगीतमय शिवपुराण कथा कीर्तन सोहळ्यात फुलंब्री तालुका कृषी विभागाच्या वतीने बुधवार (दि. ०६) रोजी कृषी विभागाच्या विविध योजना, उपक्रम, मोहिमांची माहिती देण्यात आली.
ज्यात महाडीबीटी पोर्टल वरील ठिबक व तुषार सिंचन योजना, यांत्रिकीकरण योजना , वैयक्तिक शेततळे, शेडनेट, कांदाचाळ, अस्तरीकरण, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अशा प्रकारच्या इतर विविध योजनांची महाडीबीटी पोर्टल वर ज्या लाभार्थ्यांची निवड झाली त्यांच्या कागदपत्राच्या पूर्ततेपासून ते अनुदानापर्यंत ची सर्व प्रक्रिया समजून सांगण्यात आली. केशर आंब्याने दिली हमी; फळबाग येतेय शेतकर्यांच्या कामी
शेतकर्यांना विविध योजनांचा लाभ घेताना येणार्या अडचणींवर देखील यावेळी अधिकारी ते शेतकरी अशी थेट चर्चा झाली. तसेच यातून अनेक शेतकर्यांचे विविध प्रश्न देखील मार्गी लागले.
फुलंब्रीचे तालुका कृषी अधिकारी भारत कासार, मंडळ कृषी अधिकारी निवृत्ती जोरी, कृषी पर्यवेक्षक बाळू गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कृषी सहाय्यक प्रितेश अजमेरा यांनी हि सर्व प्रक्रिया समजून सांगितली. तसेच शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने संदर्भात कागदपत्रांची शर्ती व अटींची माहिती दिली.
या प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमात सरपंच भानुदास साहेबराव तायडे, विनोद रामदास मोटे, भिकनराव सूर्यभान मोटे, भागिनाथ लक्ष्मण मोटे, राजू विठ्ठल मोटे, आदींसह गावातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.