गाळप हंगामाच्या तोंडावर ऊसतोड मजूर व मुकादमांनी राज्यव्यापी बंदचा इशारा दिला आहे. ऊसतोड मजुरांना आजघडीला २७३ रुपये प्रतिटन तर हार्वेस्टरला ४०० रुपये दर मिळत आहे. ऊसतोड मजुरांनाही ४०० रुपये प्रतिटन दर मिळावा, या मागणीसाठी सोमवारी शिरूरमध्ये ऊसतोड कामगारांनी आंदोलन करत बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील ऊसतोड मजुरांच्या हितासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीने राज्यव्यापी बंदचा इशारा दिला आहे.
शिरुर तालुक्यात सुमारे पन्नास हजार ऊसतोड कामगार आहेत. त्यांचा या संपाला पाठिंबा मिळावा यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साखर कारखाना कामगार संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सानप यांच्या उपस्थितीत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. तीन वर्षांपूर्वी साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटना यांच्यात पगारवाढीचा करार झाला होता. त्यानंतर महागाई वाढूनही पगारवाढ झाली नाही.
तीन वर्षांपूर्वी साखर संघ व ऊसतोड मजूर संघटना यांच्यात वेतनवाढीचा करार झाला होता. त्यानंतर महागाई वाढूनही वेतनवाढ मिळत नसल्याने चालू हंगामात संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा पावित्रा आंदोलकांनी घेतला आहे.