खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सर्वाधिक युरिया, १०-२६-२६, एमओपी या खतांना मागणी अधिक आहे. युरिया, एमओपी खतांचे दर गतवर्षी एवढेच असले तरी मिश्र खतांच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
रोहिणी नक्षत्रावर धूळवाफेच्या पेरण्या केल्या जातात. बहुतांश पेरण्या मृग नक्षत्राच्या पावसावर केल्या जातात. शिवाय बागायतींनाही खते घातली जातात. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर वाढला आहे; मात्र गेले काही वर्षे सातत्याने रासायनिक खतांचे दर वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते विस्कटत आहेत.
जूनमध्ये खतांचा वापर होत असला तरी मे महिन्यापासूनच खतांची खरेदी सुरू होते. मिश्र खते, सुपर पोटॅशच्या दरात वाढ झाली आहे. खतांच्या दरवाढीमुळे भविष्यात शेती करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, असे सांगण्यात येत आहे.
मजुरीतही वाढ
मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. स्त्री मजुरांचे दर २५० ते ३०० रुपये तर पुरुष मजुरांचे दर ४०० ते ४५० रुपये इतके आहेत. स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने नेपाळी, उत्तर प्रदेशातील कामगारांवर अवलंबून रहावे लागत आहे.
आर्थिक गणित कोलमडणार
• खत, बियाणे, मजुरी अन् मशागतीसाठी लागणारे यंत्र यांच्या बाजारभावात नियमित वाढच होत आहे.
• मात्र, शेतमालाचे बाजारभाव स्थिर अन् घटतेच आहेत.
• भाताला हमीभाव मिळत असला तरी दरात फारशी वाढ झालेली नाही.
• खरीप हंगामातील शेती पावसावर अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण कमी-जास्त राहिल्यास उत्पादकता धोक्यात येते.
• वानर, माकड, रानडुक्कर, गवे यासारख्या वन्यप्राण्यांमुळे
• शेतीचे नुकसान होते. शासनाकडून यावर काही उपाययोजना राबविण्यात आल्या; परंतु त्या असफल ठरल्या आहेत.
• सेंद्रिय खतांचे दर अधिक आहेत, त्यातच रासायनिक खतांचे
• दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल.
खतांचे पूर्वीचे व सध्याचे दर
खतांचे ग्रेड | खतांचे नवीन दर | खतांचे जुने दर |
10-26-26 | १,६८० | १,४७० |
24-24-0 | १,७०० | १,५५० |
युरिया | २६६ | २६६ |
20-20-0 | १,४५० | १,२५० |
कंपन्यांकडून दरवाढ कंपन्यांकडून मिश्र खताच्या दरात वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक युरिया, १०-२६-२६, एमओपी या खतांना मागणी असते. युरिया, एमओपी या खतांचे दर गतवर्षी एवढेच असले तरी अन्य मिश्र खतांच्या दरात घसघशीत वाढ झाली आहे. - राम साठे, खत विक्रेते
महागाईने दिवसेंदिवस रौद्ररूप धारण केले आहे. जिल्ह्यातील खरीप शेती पावसावर अवलंबून आहे. हवामानातील बदलामुळे पिकाची उत्पादकता धोक्यात येत असल्याने शेती करणे नकोसे वाटू लागले आहे. नांगरणीसाठी बैलजोडीच्या संगोपनाचा खर्च परवडत नाही. त्याऐवजी भाड्याने ट्रॅक्टर घेऊन नांगरणी केली जाते. रासायनिक खतांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने भविष्यात शेती करणे परवडणारे नाही. - सुदेश हळदणकर, शेतकरी
अधिक वाचा: माती व पिकांसाठी अमृत असणारं हे जीवाणू खत कसे बनवाल?