भिकाजी पाटील
बाजार भोगाव : पन्हाळा तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगफुटीसदृश विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे भात व नाचणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले भात, नाचणी पीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
असाच पाऊस दोन-चार दिवस राहिला तर उरल्या-सुरल्या पिकांचेही नुकसान होणार आहे. पडलेले भात व नाचणीतून काहीच हाती लागणार नाही. त्यापासून मिळणारी वाळलेली वैरणही कुजणार असल्याने भविष्यात वैरणीचा तुटवडा निर्माण होणार आहे. सतत पाऊस पडत असल्याने मळणी खोळंबली आहे.
ऊस तोडणीही लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीचा पाऊस हिरावून घेत असल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे नदीकाठची पिके कुजून गेली. आता माळरानातील पिके परतीच्या पावसाने खराब होत आहेत. याची शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून परिसरात जोराचा पाऊस सुरू असल्याने कापणीला आलेले भातपीक भुईसपाट झाले असून, कापण्यासारखी अवस्था नाही. जे कापले आहे ते भिजून गेले आहे. पिंजराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने वैरणीचाही प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन नुकसानभरपाई द्यावी. - रावसाहेब पाटील शेतकरी, पाटपन्हाळ