Join us

या जिल्ह्यात वर्षभर केळीची लागवड निर्यातक्षम केळीतून होतेय ५ हजार कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 10:15 AM

सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होतात. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेसह देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होते. उर्वरित ६० टक्के केळी आखाती देशात निर्यात केली जाते.

नासीर कबीरकरमाळा : गुजरात, आंध्र प्रदेशासह महाराष्ट्रातील जळगावातसुद्धा केळीचे उत्पादन ठरावीक हंगामातच होते. मात्र सोलापूर जिल्ह्यात केळी पिकासाठी नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले कोरडे हवामान, अनुकूल नैसर्गिक स्थिती, जमिनीची प्रतवारी यामुळे वर्षभर केळी लागवड होत असल्याने केळी निर्यातदारांसाठी जिल्ह्यात वर्षभर केळी उपलब्ध होतात.

सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होतात. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेसह देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होते. उर्वरित ६० टक्के केळी आखाती देशात निर्यात केली जाते.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व माढा हे दोन तालुके केळीचे हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. कंदर, टेंभुर्णी परिसरामध्ये देशातील सर्व प्रमुख केळी निर्यातदार कंपन्यांनी कार्यालये या परिसरात उघडली आहेत. हा परिसर देशातील केळी व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनला आहे.

अनुकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे सर्वात जास्त निर्यात करणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख झाली आहे. दिवसेंदिवस आखाती देशांमध्ये वाढत्या केळीला मागणी यामुळे भविष्यात कृषी क्षेत्रामध्ये फार मोठी संधी या पिकासाठी उपलब्ध आहे.

या पिकाच्या मुळे वाहतूक, कृषी निविष्ठा, केळी रोपवाटिका, पॅकिंग मटेरियल या व्यवसायाला चालना मिळाली असून लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांची मुले केळी खरेदी-विक्री व्यवसायात उतरली असून त्यांना नवीन व्यवसाय मिळाला आहे.

निर्यातक्षम केळीतून ५ हजार कोटींची उलाढालनिर्यातक्षम केळी उत्पादनामुळे या पिकाच्या माध्यमातून ५ हजार कोटींची उलाढाल होत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातून १६ हजार कंटेनर केळीची निर्यात होऊन २२०० कोटींचे परकीय चलन या व्यवसायातून देशासाठी उपलब्ध झाले आहे. यावर्षी देशासाठी ३४ हजार कंटेनर निर्यातीचे उद्दिष्ट समोर असून यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा निम्मा वाटा राहणार आहे.

भविष्यात निर्यातक्षम केळीसाठी शास्त्रीय पद्धतीने केळीचे पॅकिंग करण्यासाठी आधुनिक प्रकारची पॅक हाऊस युनिट कोल्ड स्टोरेजची निर्मिती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीस हजार मेट्रिक टन क्षमतेची कोल्ड स्टोरेज तयार झाली आहेत. अनेक नवीन कोल्ड स्टोरेजची उभारणी सुरू आहे. निर्यातीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा जिल्ह्यात उपलब्ध होत असल्याने भविष्यात केळीच्या पिकाखालील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. - किरण डोके, केळी निर्यातदार, कंदर, ता. करमाळा

टॅग्स :केळीपीकशेतकरीसोलापूरशेतीफलोत्पादन