Join us

खुलताबाद तालुक्यातील घटना; मोहगणी वृक्ष लागवडीच्या नावाखाली शेतकऱ्यांना ५५ लाखांना गंडविले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 9:54 AM

खुलताबाद तालुक्यातील विविध गावांमधील २२ शेतकऱ्यांकडून मोहगणी झाडाच्या लागवडीच्या नावाखाली दोन भामट्यांनी ५५ लाख रुपयांना फसविल्याची घटना घडली असून, याप्रकरणी आठ दिवसांनंतर खुलताबाद पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील विविध गावांमधील २२ शेतकऱ्यांकडून मोहगणी झाडाच्या लागवडीच्या नावाखाली दोन भामट्यांनी ५५ लाख रुपयांना फसविल्याची घटना घडली असून, याप्रकरणी आठ दिवसांनंतर खुलताबाद पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय, वडोद, लामणगाव, धामणगाव, विरमगाव, जमालवाडी व परिसरातील जवळपास अनेक शेतकऱ्यांनी मग्रारोहयोंतर्गत मोहगणी लागवड करण्यासाठीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला होता. त्यास पं. स.ने मंजुरी दिली.

त्यानंतर जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील चिंचखेडा येथील जगदीश राऊत याने तालुक्यातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून मोहगणीचे रोपे देतो, त्याची लागवड करून देतो व त्याची विक्री आणि तारकम्पाउंडही करून देतो, असे सांगून २२ शेतकऱ्यांकडून जवळपास ५५ लाख रुपये मार्च-एप्रिल २०२४ मध्ये जमा केले.

त्यानंतर शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मोहगणीच्या झाडांची रोपे पोहोच केली; मात्र त्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून जगदीश राऊत हा शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही. कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने शेतकरी हतबल झाले.

दि. ९ ऑगस्ट रोजी वडोद कान्होबा येथील राहुल सुभाष चव्हाण व काही शेतकरी चिंचखेडा येथे जगदीश राऊत याच्या घरी गेले याचा जाब विचारला असता जगदीश राऊत व त्याच्या नातेवाइकांनी शेतकरी चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करून त्यांच्या कारची तोडफोड करत जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी राहुल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून जगदीश राऊत, दिलीप राऊत यांच्याविरुद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात दि. ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

११ ऑगस्ट रोजी पोलिसांत फिर्याद याप्रकरणी फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर दि. ११ ऑगस्ट रोजी खुलताबाद पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांनी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी खुलताबाद पंचायत समितीमधील मग्रारोहयो विभागास पत्रव्यवहार केला.

त्यानंतर दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतकरी ज्ञानेश्वर बापूराव चव्हाण यांच्यासह २२ शेतकऱ्यांनी पुन्हा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर जगदीश राऊत, सिद्धार्थ लोखंडे या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक धनंजय फराटे हे करीत आहेत.

गंगापूर तालुक्यातील १५ शेतकऱ्यांना फसविले

गंगापूर तालुक्यातील गंगापूर, मालुंजा, तांदूळवाडी, वाहेगाव, मांजरी, शिंदेवाडी, शिरसगाव येथील १५ शेतकऱ्यांची २० लाख रुपये घेऊन अशीच फसवणूक आरोपींनी केल्याचे फिर्यादींनी सांगितले. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीधोकेबाजीखुल्ताबादमराठवाडा