Join us

आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया; यावर्षी शेतकऱ्यांना तिळाचे उत्पादन घेणे म्हणजे नाकापेक्षा मोती जड!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 1:28 PM

अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या फजितीला पारावार नाही

विनोद घोडे

आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग शेतकऱ्यांकडून केले जातात. याचाच एक भाग म्हणून दरवर्षीच्या तुलनेत यंदा देवळीसह चिकणी, पढेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून तिळाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली; पण, पेरणीपासूनच अवकाळीची अवकृपा राहिल्याने अडचण झाली.

पीक जोमदार आले पण, काढणीपर्यंत खर्चवजा जाता शून्य, अशीच अवस्था असल्याने तिळाचे पीक म्हणजे नाकापेक्षा मोती जड, अशीच प्रतिक्रिया उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.

उन्हाळ्यामध्ये शेतशिवारातील काहीच शेतकऱ्यांनी तिळाची लागवड केल्याने पावसामुळे पीकही जोमात आले; पण, ते चिमण्या पाखरांच्या तावडीतून सुटणार कसे? पक्षांनीही ताव मारून काही प्रमाणात तिळाच्या बोंड्या फस्त केल्या. यासोबतच वन्यप्राण्यांनीही आपला मोर्चा तिळाकडे वळविला.

यामुळे उभ्या पिकांचे चांगलेच नुकसान झाले. आता उर्वरित तिळाची कापणी करून तो वाळविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहेत; पण हल्ली वरुणराजा शेतकऱ्यांवर कोपला असल्याने सूर्यनारायणचे दर्शन दुर्लभ झाले आहे.

निरभ्र वातावरण असले तर कापणी केलेल्या तिळाच्या पेंढ्या शेतातच वाळवून निव्वळ उत्पादन घरी आणले जाते. परंतु यावर्षी मे महिन्यातही उन्ह नसून वारंवार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे तिळाच्या पेंढ्या वाळवयाच्या कशा ही गंभीर समस्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झाली आहे. एवढे करूनही लागवड खर्चाच्या तुलनेत उत्पादन किती होईल याची शाश्वती नाही.

हवामान खात्याने येत्या दोन ते तीन दिवसात गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. वर्धा जिल्ह्याच्या चिकणी (जामनी) सह परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या अस्मानी संकटात उन्हाळी तीळ सापडल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे.

तिळातील निंदणाचा खर्च भरमसाठ वाढला

उन्हाळी तिळाची पेरणी केली तेव्हापासूनच आठवड्याच्या अंतराने अवकाळीचा पाऊस हजेरी लावत आहे. परिणामी तिळाच्या बरोबरीने गांजर गवतासह इतरही गवत वाढले आहे. हे गवत नष्ट करण्यासाठी महिला मजुरांकडून निंदण करावे लागतात. हा अधिकचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. बहुतांश शेतकऱ्यांना तिळाच्या शेतात निंदणाचा खर्च अधिक आला आहे.

तिळाचे उत्पादन घेणे म्हणजे कमालीची डोकेदुखी आहे. यंदा या अवकाळी पावसाने नाकात दम आणला आहे. सर्व संकटातून वाचविलेल्या तीळ पिकाची कापणी केली. दरवर्षी तिळाच्या पेंढ्या शेतातच वाळविल्या जात असे व निव्वळ उत्पादन घरी आणल्या जायचे; पण, यंदा वातावरण ढगाळ असून अधूनमधून अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे कापणी केलेला तीळ घरी आणावा लागला. या तिळाच्या पेंढ्या वळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातून लागवड खर्च निघणे कठीण आहे. - लीलाधर रेवतकर, शेतकरी पढेगाव. 

पक्ष्यासह वन्यप्राण्यांचा त्रास अधिकच...

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळी तिळाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते; पण वाढत्या तापमानामुळे व वारंवार होत असलेल्या अवकाळी पावसामुळे तसेच चिमण्या-पाखरांच्या थव्यांनी तिळावर ताव मारला, इतकेच नव्हे तर वन्यप्राण्यांचाही कमालीचा त्रास वाढला आहे. तिळाचे उत्पादन घरी येईलच, याची काही शाश्वती नाही.

हेही वाचा - Organic Fertilizer गाजर गवतापासून या सोप्या पद्धतीने तयार करा दर्जेदार सेंद्रिय खत

टॅग्स :शेतीविदर्भशेतकरीपीक व्यवस्थापनबाजार