जब्बार चिनी
पावसाची नोंद करणारे पर्जन्यमापक यंत्र महसूल मंडळात बसवण्यात आले आहे. आणि पाऊस शिवारात पडतोय, असा काहीसा प्रकार सध्या घडत आहे. त्यामुळे पर्जन्यमापक यंत्रामध्ये पावसाची नोंद होत नसल्याने महसूल मंडळातील पर्जन्यमापक यंत्र व त्यात पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे.
प्रत्येक गावांत पर्जन्यमापक यंत्र बसवणे आवश्यक आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देताना मंडळातील पर्जन्यमापक यंत्रावरील नोंदीनुसार पावसाची नोंद केली जाते.
सध्या पावसाच्या लहरीपणामुळे मंडळात पाऊस नाही, तर परिसरातील गावात अतिवृष्टी होते. मात्र, त्या पावसाची नोंद होत नसल्याने पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान होऊनही फक्त पावसाची नोंद नसल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.
१९ व ३१ ऑगस्टला यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट मंडळात गाव शिवांरासह सावंगी, नायगांव, साखरा (कोलगांव) या गावच्या शिवारांत ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यात कोवळी पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. तसेच शेतजमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
परिसरात ढगफुटीसदृश पाऊस पडला. लगतच्या शिंदोला मंडळात ९८ एमएम पाऊस पडल्याची नोंद असताना, पुनवट मंडळात फक्त ३७.३ मिलिमीटर अशी चुकीची नोंद झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईला मुकावे लागणार आहे. त्यामुळे पाऊस मोजण्याचे मंडळातील हे निकष शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहेत.
यासंबंधी सावंगीचे माजी सरपंच धनराज राजगडकर, पुनवटचे सरपंच प्रदीप जेऊरकर व अन्य शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
१४० गावांसाठी फक्त नऊ पर्जन्यमापक यंत्रे
वणी तालुक्यात एकूण १४० गावे असून, त्या गावांसाठी नऊ महसुली मंडळे आहेत. प्रत्येक महसुली मंडळात पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित आहे. अतिवृष्टी, गारपिटीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानींची भरपाई ही पर्जन्यमापक यंत्राच्या आधारेच दिली जाते. त्यामुळे प्रत्येक गावाचा पाऊस व नुकसान मोजायचे कसे ? सध्या तर एकाच गावाच्या दोन टोकाला कमी, अधिक पाऊस होतो. सरासरी आकडेवारी शासनाला सादर होऊन तशी नुकसानभरपाई मंजूर होते व खरा नुकसानग्रस्त शेतकरी त्यातून वंचित राहतो.
अचूकता नसल्याने शेतकऱ्यांना फटका
राज्यात पडलेल्या पावसावर शेतीचे धोरण निश्चित होते. पीक विमा योजना याच केंद्राच्या आधारावर लाभ देण्याचे निश्चित करते, तर शासनाच्या इतर योजनांचा लाभ याच नोंदीवरून देण्यात येतो. मात्र पर्जन्यमापक यंत्रे ही १० ते १२ गावांना मिळून केवळ महसुली मंडळात एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे पर्जन्यमानाची अचूकता मिळत नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीचा फटका बसतो.