रानडुक्कर, हरीण (सारंग व कुरंग), रानगवा, रोही (नीलगाय) माकड, वानर तसेच वनहत्ती या वन्यप्राण्यांपासून शेतीला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास शासन निर्णयामधील तरतुदीनुसार नुकसानभरपाईची रक्कम संबंधितांना देण्यात येते. आता या नुकसानभरपाई रकमेत तब्बल सात वर्षांनी शासनाने वाढ केली आहे. त्याची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाली आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागाच्या २२ सप्टेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार फळझाडाच्या नुकसानभरपाई रकमेत वाढ करण्यात आली आहे. फळबागांच्या केलेल्या नुकसानापोटी द्यावयाचे आर्थिक साहाय्य प्रजातीनिहाय व झाडाच्या वयानुसार देण्यात येणार आहे, तर याबाबत आवश्यक असणाऱ्या इतर अटी व तरतुदी या पूर्वीच्या शासन निर्णयानुसार लागू राहणार आहे.
या शासन आदेशानुसार येथील विभागीय वनअधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन निर्णयातील अटी व तरतुदीनुसार या योजनेचा लाभ घेता येईल, असे सांगण्यात आले आहे.
भरपाईसाठी अर्ज द्या
ज्या शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झालेले आहे, त्यांनी नव्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने नुकसानाबाबत अर्थसाहाय्य मिळण्यासाठी नजीकच्या वनअधिकारी कार्यालयाकडे अर्ज जमा करावेत, असे आवाहन वन खात्याने केले आहे.