Join us

हवेचे प्रदूषण वाढले; शेतजमीन सुपिकतेवर परिणाम, हे सेंद्रीय पदार्थ चुकूनही जाळू नका..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 2:00 PM

उसाचे पाचट, गव्हाचे धसकट जाळावे का?

अलीकडे शेतातील काम झटपट पूर्ण व्हावे यासाठी शेतकरी सतत प्रयत्न करतो. पीक हाती आल्यानंतर दरवर्षी उन्हाळ्यात शेतातील धानाचे तणस, तूर पिकाच्या तुराट्या, सोयाबीनचे धसकट सरसकट जाळून शेतजमीन स्वच्छ करण्यावर भर दिला जातो. मात्र, यामुळे हवेचे प्रदूषण होऊन शेतजमिनीची सुपीकताही कमी होत आहे.

या सुपीकतेवर परिणाम होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील पीक निघाल्यानंतर त्यापासून तयार झालेले धसकट, तणस व इतर वस्तू तेथेच पसरवून ठेवावेत किंवा बाजूला ढीग करून त्याला कुजू द्यावे. जेणेकरून सेंद्रिय खत तयार होईल. शेतकऱ्यांनी ते जाळण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला कृषितज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

अलीकडे शेतीच्या कामात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. पीक निघाल्यानंतर शेतातील तणस, रोटावेटरच्या साहाय्याने संपूर्ण जमिनीत पसरविता येते. त्या तणसाला कुजवून त्यापासून सेंद्रिय खत तयार करता येतो. मात्र, शेतकरी असे न करता सरसकट तणस जाळून टाकत असल्यामुळे जमिनीचा पोत घसरत आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आवश्यक आहे.

उसाचे पाचट 

ऊस निघाल्यानंतर उरलेले पाचट शेतकऱ्यांनी जाळू नये. जेणेकरून हवेचे प्रदूषण होणार नाही आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहील, तसेच तणसही जाळू नये.

तूर पिकाच्या तुराट्या 

तूर पीक हाती आल्यानंतर त्याच्या तुराट्या, धसकट जाळू नये. ते एका ठिकाणी जमा करून त्यांना पावसात कुजू द्यावे. म्हणजे त्याठिकाणी खत निर्माण होईल.

प्रदूषण वाढले जमिनीसाठीही धोकादायक

शेतमाल हाती आल्यानंतर जमीन स्वच्छ करण्याच्या नावावर कचरा आग लावून जाळला जातो. यामुळे हवेचे प्रदूषण वाढले असून, जमिनीसाठी ते धोकादायक बनले आहे. कारण त्यातील सेंद्रिय पदार्थ पूर्णतः नष्ट होतात. सूक्ष्मजिवांना धोका होत असतो.

जमिनीत गाढणे लाभदायक

शेतातील पीक निघाल्यानंतर उरलेला कच्चा माल जमिनीत गाडणे लाभदायक आहे. उसाचे पाचट, तूर, मूग, उडीद व इतर कडधान्यांचे कुटार कुजू दिले पाहिजे. त्यातून सेंद्रिय खत निर्माण होईल.

शेतकऱ्यांनी सेंद्रीय खत तयार करावा

शेतात पाचट किंवा इतर पिकांचे तणस, धसकट जाळल्याने हवेचे प्रदूषण होते. कार्बन डायऑक्साइड वायू हवेत मिसळतो. जमिनीमध्ये गांडूळ, कीटक, तसेच विविध प्रकारचे सूक्ष्म जीव असतात. शेतात आग लावल्याने हे सूक्ष्मजीव नष्ट होतात. परिणामी, सुपीकता कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेताला आग न लावता त्या वस्तू कुजू दिल्या पाहिजेत, असे आवाहन कृषी विभागाने केले.

टॅग्स :प्रदूषणशेती क्षेत्रसेंद्रिय शेती