यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळी घट झाल्याने ४० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच आता भूजल सर्वेक्षण विभागाने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणामध्ये आठ तालुक्यांमधील भूजल पातळीत घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्याची भूजलपातळी जवळपास २.३७ मीटरने घटल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. परतूर, घनसावंगी, भोकरदन आणि बदनापूर तालुक्यांची पाणीपातळी जवळपास अडीच मीटरने घटली आहे.
यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस झाला नाही. रिमझिम पावसावरच पिके आली होती. त्यातच परतीचा पाऊसही झाला नसल्याने भूजलपातळीत वाढ झाली नाही, त्यामुळे मार्च महिन्यामध्ये निर्माण होणारी परिस्थिती ऑक्टोबर महिन्यातच दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाळा संपतो. या काळात झालेल्या पावसावर भूजलपातळी जानेवारी महिन्यापर्यंत स्थिर राहते; परंतु, यावर्षी कमी पाऊस झाला आहे. पावसाळ्यातील बहुतांश दिवस कोरडे गेले. परिणामी ऑक्टोबर महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आठ तालुक्यांमधील भूजलपातळीत घट नोंदविण्यात आली.
कमी पावसामुळे शेततळ्यांनी गाठला तळ, बागायती क्षेत्र घटणार
पीक उगवण्याची शाश्वती नाही
- दरवर्षी सोयाबीन कापडीनंतर रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा या रब्बी पिकांच्या पेरण्या करण्यात येतात.
- परंतु कमी पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्याने पेरणी करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
- पुढे एखादा उकाळी पाऊस पडला तर जनावरांना चारा तरी होईल अशाने पेरणी केली आहे. पेरलेले उगवून येईल याची शेतकऱ्यांना शाश्वती नाही.
११० विहिरींचे केले निरिक्षण
- भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील जवळपास 110 विहिरींचे निरीक्षण केले आहे. त्यात 90 विहिरींच्या पाणी पातळीत घट झाली आहे तर बारावीचा पाणी पातळीत वाढ झाली आहे.
- अंबड तालुक्यातील १२, बदनापूर १०, भोकरदन २३, घनसावंगी १३. जाफराबाद १० जालना १२, मंठा १० आणि परतूर तालुक्यातील ८ विहिरींची पाणी पातळी घटली आहे. तर बदनापूर २, भोकरदन २. घनसावंगी १, जाफराबाद ३, जालना ३ आणि परतूर तालुक्यातील एका विहिरीची पाणी पातळी वाढली आहे.