सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या उमरा परिसरात मजुरांची वाढती टंचाई लक्षात घेत शेतकरी आता शेतात तणनाशक मारत आहेत. परिणामी, पावसाळ्यात शेतात उगवणाऱ्या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या पालेभाज्या, रानभाज्या नामशेष होऊ लागल्या आहेत. त्यामुळे यावर्षी रानभाज्यांची चव दुर्मीळ झाल्याचे दिसून येत आहे.
तणनाशकाला पर्याय निर्माण करण्यात यंत्रणेला आलेले अपयश व शेतकऱ्यांमध्ये प्रबोधनाचा अभावामुळे रानभाज्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रानभाज्या आरोग्यासाठीदेखील तितक्याच चांगल्या आहेत. पावसाळ्यात ग्रामीण भागात शेतात उगविणारा सुरुवातीला तरोटा, जुतीचे फुले, फांदीची भाजी, कंटुले, आंबाडी, घोळ, माट, चिवड, सफू काटवल आदी रानभाज्या पावसाळ्यात आनंदाने जेवणात असायच्या. रानभाज्या अलीकडच्या काळात दुर्मिळ होत चाललल्या आहेत.
तर मजूरटंचाईचा प्रश्न मार्गी लागेल
शेतीमध्ये तण नियंत्रणासाठी मजुरांची आवश्यकता असते. मात्र, मजुरांची टंचाई आणि वाढलेले दर शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणत आहेत. त्यामुळे शेतकरी नाइलाजाने तणनाशकाकडे वळला आहे. शासनाने शेती कामासाठी रोजगार हमीची जोड घातल्यास शेतकऱ्यांना मजूर मिळेल व तणनाशकाचा वापर कमी होईल. मजूरटंचाईचा प्रश्नसुद्धा मार्गी लागण्याची शक्यता आहे.
विनामूल्य मिळणाऱ्या रानभाज्या आहारातून गायब
गत काही वर्षांपासून मजुरांची टंचाई निर्माण 'झाल्याने पिकातील गवत व पडीत जागेवरील तरोटा, वेलवर्गीय वनस्पती मारण्यासाठी शेतकरी तणनाशकाकडे वळला आहे. यामुळे तणाबरोबरच पावसाळ्यात हमखास उगविणाऱ्या पालेभाज्याही नष्ट होऊ लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी कुटुंबासह इतरांना विनामूल्य मिळणाच्या रानभाज्या आहारातून गायब झाल्या आहेत.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या उमरा शिवारात बहुतांश भागांत रानभाज्या होत्या. मात्र, पावसाळ्यात शेतात निघणाऱ्या बऱ्याच रानभाज्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे विषमुक्त भाज्या मिळणे कठीण झाले आहे. अशोक देव, उमरा
शेतात या आधी रानभाज्या सहजासहजी मिळत होत्या. मात्र, आता त्या शोधूनही मिळणे कठीण झाले आहेत. त्यामुळे रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. विजय भगत, उमरा
रानभाज्या या आरोग्यासाठी उपयोगी असल्याने या भाज्या आम्हाला लहानपणी जास्तीत जास्त खायला मिळत होत्या. मात्र, आता तणनाशक फवारणीमुळे बहुतांश रानभाज्या दुर्मीळ होत आहेत. सत्यविजय झगडे, उमरा