निशांत वानखेडे
नागपूर : भारतात दरवर्षी संत्रा, माेसंबी या लिंबूवर्गीय फळांच्या लागवडीसाठी १.७० काेटी कलमांची गरज असते. लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था (सीसीआरआय) च्या पुढाकाराने २० ते ३० लक्ष कलमांची निर्मिती हाेते. त्यामुळे अद्यापही १.५० काेटी कलमांचा तुटवडा भरून काढणे जवळजवळ अशक्यप्राय असल्याची कबुली सीसीआरआयचे संचालक डाॅ. दिलीप घाेष यांनी दिली.
राेपांची निर्मिती करणे ही संस्थेची जबाबदारी नाही, मात्र जगभरातील लिंबूवर्गीय फळांचे संशाेधन करताना शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण कलम पाेहचावे या उद्देशाने राेपांची निर्मिती केली जाते. संस्थेकडून दरवर्षी ३ लक्ष कलमांची निर्मिती केली जाते. यासह संस्थेने देशातील १२ खाजगी नर्सरीसाेबत करार केला असून या माध्यमातून २० ते २५ लाख कलमा तयार केली जात आहेत. अशाप्रकारे ३० लाखापर्यंत कलमा तयार हाेतात पण देशाची गरज पाहता दीड काेटी कलमा तयार करणे सध्यातरी दिवास्वप्न आहे. आणखी नर्सरींसाेबत करार करून पुढच्या ७-८ वर्षात १ काेटी कलमांची निर्मिती करण्याचा प्रयत्न संस्थेद्वारे करण्यात येत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
जगभरात १५० देशांमध्ये लिंबूवर्गीय फळांची लागवड केली जात असून १६२ दशलक्ष टनाचे उत्पादन केले जाते. भारतात १४२ लाख टनाचे उत्पादन हाेत असून चीन व ब्राझीलनंतर भारताचा तिसरा क्रमांक लागताे. एकूण उत्पादनाच्या ५२ टक्के उत्पादन आशियायी देशातून हाेते. मात्र गुणवत्तेबाबत पाश्चात्य देशांपेक्षा मागे असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान बदलाचा प्रभाव, फळांवरील आजार व उत्पादन वाढीचे प्रभावी नियाेजन पाश्चात्य देश करतात. त्यामुळे भारतात प्रतिहेक्टर ३० टन उत्पादन हाेत असताना तिकडच्या देशात दुपटीने उत्पादन केले जाते. तंत्रज्ञान व लिंबूवर्गीय फळांवर प्रक्रिया उद्याेगाबाबतही भारतासह आशियामध्ये उदासीनता असल्याची भावना डाॅ. घाेष यांनी व्यक्त केली.
नव्या व्हरायटीच्या ५५ लाख कलमा शेतकऱ्यांना दिल्या
सीसीआरआयद्वारे गेल्या काही वर्षात संत्रा, माेसंबी व लिंबूच्या ९ नवीन व्हेरायटी विकसित करण्यात यश मिळविले असून ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाेहचविले आहे. नव्या प्रकारच्या ५५ लाख कलमांची निर्मिती करून देशभरातील शेतकऱ्यांना दिले असून ५० हजार हेक्टरवर त्याची लागवड केली जात असल्याचे डाॅ. दिलीप घाेष यांनी स्पष्ट केले. यातील ७० टक्के कलम महाराष्ट्रात व उर्वरित २० राज्यात पाठविण्यात आले. ८ नव्या व्हरायटी संशाेधनाच्या प्रक्रियेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूरी संत्रा प्रजातीची चाेरी अशक्य
नागपुरी संत्रा जगभरात लाेकप्रिय आहे व अनेक देशांना या प्रजातीच्या लागवडीची अपेक्षा आहे. मात्र विदर्भातील वातावरणानुसार इतर ठिकाणी तशी गुणवत्ता सहज शक्य नाही. दुसरे म्हणजे नागपूरी संत्र्याचे ‘जिओग्राफिक इंडिकेशन’ झाले आहे, त्यामुळे कुणी लागवड केली तरी त्याची राॅयल्टी द्यावीच लागेल.