फळ फळावळ उत्तम अशी ओळख असणाऱ्या अमेरिकेपेक्षा भारताची जमीनच लिंबूवर्गीय पीकांसाठी सुपीक असल्याचे मत फ्लोरिडा विद्यापीठाचे प्राध्यापक व संशोधक डॉ. मायकल रॉजर यांनी व्यक्त केले. भारताच्या जमिनीत जल भंडारण क्षमता, पोषक घटक अधिक असून रोगप्रतिकार क्षमता चांगली असल्याने रोगांचेही प्रमाण कमी आहे. त्यामुळे उत्पादन व गुणवत्तावाढीसाठी अधिक प्रयत्न केले तर सिट्रस उत्पादनात भारत आघाडी घेऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एशियन सिट्स काँग्रेसनिमित्त नागपुरात आलेले डॉ. रॉजर यांनी लोकमतशी संवाद साधला. डॉ. रॉजर यांनी ७०० च्या जवळपास संशोधन केले आहेत. अमेरिकेच्या फ्लोरिडा बेल्टमध्ये सर्वाधिक संत्रा होतो. मात्र ही शेती समुद्र किनाऱ्यालगतच्या भूमीवर होते. त्यामुळे पोषक घटक कमी, जल भंडारणाची क्षमता कमी व आघाडी घेऊ शकेल, असा विश्वास एचएलबी'सारख्या रोगांचा प्रादुर्भाव अत्याधिक आहे. मात्र या समस्यांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. सिंचन सुविधा व रोगावर नियंत्रणासाठी संशोधनाचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या रूट स्टॉक बदलण्याचे तंत्रज्ञान प्रभावी ठरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीचे परिणाम सिट्सवरही दिसून येत आहेत. पाण्याची कमतरता, अधिक तापमानामुळे झाडे सुकण्याची समस्या आणि रोगांच्या प्रादुर्भावाची वारंवारता वाढल्याचे डॉ. रॉजर यांनी सांगितले. भविष्यात ही समस्या अधिक भीषण होऊ शकते, त्यामुळे आताच उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
संशोधनाचे आदानप्रदान आवश्यक
सिट्सबाबत भारत-अमेरिका किंवा इतर देशांची परिस्थिती वेगवेगळी असली तरी समस्या एकसारख्या आहेत. त्यामुळे अशा परिषदांच्या माध्यमातून संशोधनाचे आदानप्रदान होणे गरजेचे आहे. भारताकडे चांगले संशोधन आहे. त्याचा उपयोग अमेरिकेला व तेथील संशोधनाचा भारताला निश्चित लाभ होईल, असा डॉ. रॉजर यांनी व्यक्त केला.
औषधांच्या मान्यतेची प्रतीक्षा
फ्लोरिडा विद्यापीठाने लिबूवर्गीय फळांवरील रोगांच्या नियंत्रणासाठी 'बीझेड नॅनो तंत्रज्ञान', '२,४-डी, 'झिकीसाईड आदी चाचण्या यशस्वी केल्या आहेत. मात्र बऱ्याच प्रशासकीय मान्यता व पर्यावरणविषयक मान्यता मिळणे बाकी आहे. त्यासाठी वेळ लागणार आहे. त्यानंतरच ते संशोधन विश्वास शेतकऱ्यांच्या उपयोगात येईल, असे डॉ. रॉजर यांनी सांगितले.