Join us

जागतिक अन्नथाळीत भारतीयांचे मिलेट असणार

By बिभिषण बागल | Published: August 22, 2023 10:42 PM

“अजैविक ताण व्यवस्थापनातून शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणाली” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन आज बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमधील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात झाले.

भारतीय कृषि संशोधन परिषद-राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य आणि कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने सोसायटी फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च ऑन अबायोटिक स्ट्रेस (SARAS), “अजैविक ताण व्यवस्थापनातून शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणाली” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन आज बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमधील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात झाले.

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने हे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात येत आहे. या राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे हिमांशू पाठक, सचिव कृषि अनुसंधान व शिक्षण विभाग, कृषि मंत्रालय, भारत सरकार आणि महासंचालक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR), भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे उपमहासंचालक (NRM) डॉ. एस के चौधरी, कर्नाटकमधील धारवाड कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. एल.पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू. डॉ. शरद गडाख, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे चेअरमन डॉ. राजेंद्र पवार, डॉ. सम्मी रेड्डी, संचालक, एनआयएएसएम, बारामती, आयोजन सचिव डॉ. संग्राम चव्हाण आणि डॉ. तायडे तसेच प्रतिष्ठित शास्त्रज्ञ, संशोधक, शेतकरी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. हिमांशू पाठक आपले मत व्यक्त करताना संपूर्ण जागतिक अन्नथाळीत भारतीयांचे मिलेट असणार असा व्यापक दृष्टीकोन ठेवून आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे आणि यासाठी कृषी अनुसंधान परिषद, राज्य कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांसाठी पौष्टिक भरडधान्यांचे विविध चांगले वाण देऊन उत्पादकता वाढवत आहे. कार्यक्रमा दरम्यान इतर अथिती आणि तज्ञांनी आपले मते मांडली. या दरम्यान छोटेखानी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले व दरम्यान ७० हून अधिक शोध प्रत्रांचे सादरीकरण व २५ हून अधिक विविध तज्ञांची मार्गदर्शनपर सादरीकरण होणार आहेत.

हे संम्मेलन चार प्रमुख तांत्रिक सत्रांमध्ये विभागले असून यात भरड धान्य उत्पादकतेवर विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित केलेली आहेत तसेच विविध शास्त्रज्ञ आणि संशोधक विद्यार्थ्यांच्या शोध प्रत्रांचे सादरीकरण होणार आहे. या चर्चासत्रासाठी विविध राज्यांमधून शास्त्रज्ञ, धोरणकर्ते, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थ्यांसह ३५०-४०० प्रतिनिधींच्या अपेक्षित सहभागासह, या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहयोगासाठी बौद्धिकदृष्ट्या एक उत्तम व्यासपीठ असल्याचे निर्धारित केले आहे. या शिवाय भरड धान्याशी निघडीत असे छोटे प्रदर्शन डेलहिल आयोजित कण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजकुमार व आभार प्रदर्शन आयोजन सचिव डॉ. संग्राम चव्हाण यांनी केले. राष्ट्रगीताने उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला.

टॅग्स :शेतीशेतकरीपीकसरकारकृषी विज्ञान केंद्रबारामती