Join us

बियाणे उत्पादनात भारताची निर्यात केवळ २ टक्के!

By मुक्ता सरदेशमुख | Published: December 11, 2023 4:02 PM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून तीन दिवसीय १२ व्या राष्ट्रीय बीज काँग्रेस परिषदेचे आयोजन

बियाणे उत्पादनात भारताची निर्यात केवळ २ टक्के असल्याचे आज राष्ट्रीय बीज काँग्रेस परिषदेत सांगण्यात आले. बदलत्या हवामानात विज्ञानाची कास धरून बदल करण्याला पर्याय नसल्याचे आयसीएआरचे माजी सचीव मंगला राय यांनी सांगितले. बदलत्या हवामानात बियाणे उपलब्धतेतील नाविन्यता आणि आव्हाने या विषयावर आज तीन दिवसीय परिषदेचा पहिला दिवस पार पडला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून तीन दिवसीय १२ व्या राष्ट्रीय बीज काँग्रेस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ३०० हून अधिक कृषी शास्त्रज्ञ, तज्ञ आणि उच्च सरकारी अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात बदलत्या हवामानात दर्जेदार बियाणांची उपलब्धता, नवनवीन शोध आणि आव्हाने याविषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बियाणांमधील जीन तंत्रज्ञान आव्हाने यावरही चर्चा करण्यात येणार आहे.

“जगभरातील साधारण २.३ टक्के जमीन, १८ टक्के लोकसंख्या केवळ ४.२ टक्के पाणी भारताकडे आहे. असे असताना भारताच्या जमिनीवर असणारा ताण हा जगाच्या तुलनेत ५ ते ६ टक्के अधिक आहे. असे असताना, या जमिनीत कशा पद्धतीने शेती करायला हवी? हा आताचा प्रश्न आहे. आपण हवामान बदलांवर बोलतो. हवेत होणाऱ्या कार्बन उत्सर्जनावर बोलतो. पण आपण आशिया अहवालाकडे पूर्णत: दूर्लक्ष केले आहे. हा अहवाल असे सांगतो की, या हवामान बदलामुळे आशियाई देशांच्या जमिनीची झालेली वाताहात १ ते १० च्या पट्टीत नवव्या क्रमांकावर आहे. ही केवढी गंभीर परिस्थिती आहे!” असे मंगला राय, आयसीएआरचे माजी सचीव म्हणाले.

२६ टक्के माती रासायनीक फवारण्यांनी बिघडली

मातीच्या पोषण मुल्यांमध्ये मोठी कमतरता आहे. २६ टक्के माती ही रासायनीक फवारण्यांनी, औषधांनी बिघडली आहे. मातीच्या गुणतत्तेत कमालीची घसरण झाली आहे.  हवामान बदलणार आहे ही बाब खरी पण विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची कास धरत  पुढे गेलो तरच ही वाताहात थांबणारी आहे असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :हवामानशेतकरीतापमानखते