अंबड तालुक्यातील हस्तपोखरी परिसर हा मोसंबी फळबागेचा आगार समजला जातो. वातावरणातील अचानक बदलामुळे मोसंबी फळबागेला मोठा फटका बसत असून फळबाग उत्पादकात सध्या चिंतेचे वातावरण आहे. सध्या मोसंबी बागेला मृग बहराची मोसंबी लगडलेली असून बाजारात विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे; परंतु सततचे धुके पडत आहे, तर कधी थंडी कधी उष्णता यामुळे मोसंबी बागांवर मुंगा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने फळे काळी पडणे, फळगळ होत आहे. याचा उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शासनाने मदत करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
फळ काळे पडले
सध्या माझ्याकडे मोसंबीची फळ धारणा केलेली २०० झाडे आहेत. मोसंबीवर मुंगा रोगाने हल्ला चढविला आहे. यात फळ काळे पडून मोठी फळगळ होत आहे. यावर्षी म्हणावा तसा आंबा बहर फुटला नाही. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
मधुकर भाषे, शेतकरी, हस्तपोखरी.
नुकसानभरपाई द्यावी
वातावरणातील बदलामुळे यावर्षी मोसंबी बागेला मोठे ग्रहण लागले आहे. बुरशीजन्य मुंगा रोग व अल्प पावसाळ्यामुळे पाणी कमी पडत आहे. त्यामुळे बागेची मोठी फळगळ होत आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी.- बाबासाहेब वाघ, शेतकरी हस्तपोखरी