आष्टी तालुक्यातील कन्हेवडगाव परिसरातील उडिदाच्या पिकावर खोडमाशी, मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेकडो एकरवरील उडीद पीक जळाले आहे. अगोदरच उशिरा पेरणी होऊन कसेबसे आलेले पीक ऐन जोमात असतानाच कोमात गेले आहे. शेतकऱ्यांनी उडीद पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती देताच तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी बांधावर जाऊन ट्रायझोफोस किंवा प्रोफेनोफॉस सायपरमेथ्रीन १५ मिली प्रति १० लिटर पाणी फवारणी करण्याचे आवाहन केले आहे.
यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी जवळपास पूर्ण झाली असून उडिदाची पिके रिमझिम पावसावर चांगली तरारली आहेत. ही पिके जोम धरू लागली असतानाच या पिकांवर खोड माशी, मर रोगाचा प्रकोप सुरू झाल्याने जोमात आलेली पिके जळू लागली आहेत. या रोगामुळे पीक उत्पादनात घट होण्याची भीती आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मर रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार तत्काळ कीटकनाशक फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
बुधवारी कन्हेवडगाव येथील बांधावर जाऊन गोरख तरटे, राजेंद्र धोंडे, कृषी सहायक सोपान बांगर यांनी पाहणी केली. यावेळी शेतकरी गंगाधर गायकवाड, केशव बांगर, सुभाष नागरगोजे, रंगानाथ नागरगोजे, बापू नागरगोजे, सचिन नागरगोजे, बाबासाहेब नागरगोजे, उमेश बांगर, विश्वनाथ नागरगोजे उपस्थित होते.