टेंभुर्णी परिसरात मागील एक महिन्यापासून वारंवार धुके पडत आहे. या धुक्यामुळे परिसरातील संपूर्ण रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. यामुळे खरीप हंगामात होरपळलेल्या बळीराजाची चिंता वाढली आहे. अळीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने पिके धोक्यात आली आहेत.
टेंभुर्णीसह परिसरात यावर्षी अत्यल्प पावसामुळे रब्बी हंगामात गव्हाची पेरणी अत्यल्प झाली आहे. शेतकऱ्यांनी अवकाळीच्या भरवशावर कोरड्यातच हरभरा व शाळू ज्वारीची पेरणी केली होती. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे कोरड्यात पेरलेल्या हरभरा, शाळू ज्वारी या पिकांना जीवदान मिळणार आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी अवकाळी पावसानंतर मोठ्या प्रमाणात शाळू ज्वारीची पेरणी केली होती. सद्यस्थितीत वारंवार धुके पडत असल्याने हरभरा, शाळू ज्वारी, गहू आदी पिके धोक्यात आली आहेत.
संबंधित-ज्वारी पिकातील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन
सध्या शाळू ज्वारीवर चिकटा पडत असल्याने कणसे काळवंडली जात आहे. याशिवाय गव्हाच्या ओंब्यांवरही अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. नुकत्याच फुलत असलेल्या हरभऱ्याची फुलगळ होत असल्याने हरभऱ्याचेही मोठे नुकसान होत आहे. उशिरा पेरलेल्या शाळू ज्वारीवरही सध्या धुके व ढगाळ वातावरणामुळे करपा अळीने हल्ला केला आहे. यामुळे खरीप हंगामात होरपळलेल्या शेतकऱ्याला रब्बी हंगामातही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
बळीराजाला रब्बी हंगामावरील खर्चाबाबत चिंता
दरम्यान, रब्बी हंगामावर केलेला खर्चही वसूल होतो की, नाही याची चिता बळीराजाला लागली आहे. महागड्या फवारण्या करूनही हा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. नेमकी काय उपाययोजना करावी हे समजत नसल्याने शेतकरी गांगरून गेले आहेत. या रोगराईवरील उपाययोजनेबाबत कृषी विभागामार्फत बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.