मागच्या पाच दिवसांपूर्वी अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षाचे दर अचानक कोसळले आहेत. त्याचबरोबर सांगली भागातील द्राक्ष बागांवर बुरशीजन्य करपा रोग पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात करप्याचा प्रादुर्भाव झालेल्या द्राक्षांच्या घडाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
दरम्यान, मध्येच झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे दर थेट निम्म्यावर आले आहेत. निर्यातीसाठी होणारी पॅकिंगही बंद पडल्यामुळे १२० ते १४० रूपयांचे असलेले दर थेट ५० ते ६० रूपयांवर आले असल्याची माहिती बारामती येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी गणेश नाझीरकर यांनी दिली. अचानक पडलेल्या दरामुळे त्यांनी पुण्यात येऊन द्राक्षाची थेट ग्राहकांना विक्री केली.
करपा रोगाचा प्रादुर्भावसांगली जिल्ह्यातील ५ हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागांवर बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने द्राक्षावर काळे डाग पडले आहेत. या मालाला लोकल मार्केटमध्ये दर नसल्याने ही द्राक्ष रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्याचबरोबर निर्यातक्षम द्राक्ष बाधित झाल्यामुळे शेतऱ्यांचे जवळपास ३०० कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
धुक्याचे आव्हानधुके पडले तर मण्याला तडे जातात आणि द्राक्षांचा पूर्ण घड वाया जातो. त्यामुळे निर्यातक्षम, लोकल, वायनरीसाठी वापरला जाणारा द्राक्ष मालसुद्धा वाया जातो. म्हणून धुक्याच्या दवामुळे होणाऱ्या नुकसानीचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. सध्या अर्ली हार्वेस्टिंग सुरू असलेला बहुतांश माल निर्यात केला जात आहे. लोकल मार्केटसाठी येणारा माल येणाऱ्या काळात हार्वेस्टिंगसाठी तयार होईल.
मागच्या पाच दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे दर पडले. या पावसाने द्राक्षांचा दर्जा जरी कमी झाला नसला तरी दर पडले असून निर्यात थांबली आहे. द्राक्षांव्यतिरिक्त इतर भाजीपाला पिकांचेसुद्धा हेच झाले आहे. ज्या मालाला लोकल बाजारात ९० ते ९५ रूपये दर सुरू होता आणि निर्यातीसाठी १२० ते १४० रूपयांपर्यंत दर मिळत होता तो माल ५० ते ६० रूपयांना विकावा लागत आहे. - गणेश नाझीरकर (द्राक्ष उत्पादक शेतकरी )