सध्या तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे तूर पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. या पिकाच्या उत्पादनात घट होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनी वेळेवर किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरुवातीला पिकाच्या कोवळ्या पानांवर फुलांवर किंवा शेंगांवर उपजीविका करतात. नंतर शेंगा भरताना त्या दाणे खातात. दाणे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग शेंगांमध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेवलेल्या अवस्थेत शेतात आढळतात. त्यामुळे आतील कोवळ्या दाण्याचे जवळपास ६० ते ८० टक्के नुकसान होते.
कीड नियंत्रणासाठी काय करावे?
१) तुरीमध्ये एकरी ५ कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप्स) पिकाच्या एक फूट उंचीवर लावावेत.
२) पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी ५० ते ६० पक्षी थांबे शेतात लावावेत. जेणेकरून त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळ्या वेचून खातील.
3) पीक कळी अवस्थेत असताना ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
४) किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर (५ अळ्या प्रतिझाड) आढळून आल्यास इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के एस. जी. ४ ग्रॅम किंवा क्लोरॉन्ट्रानिलिप्रोल १८.५ एस. सी. ३ मिली. इंडोक्साकार्ब १४.५ एस. सी. ६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी भरत नागरे यांनी केले आहे.