पाण्याअभावी मोसंबी बागा सुकू लागल्या असून, शेतकरी अडचणीत आले आहेत. यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कचनेर (ता. पैठण) येथील एका शेतकऱ्याने आपली दोनशे मोसंबी झाडांची बाग कुर्हाड चालवून रविवारी (दि. १७) नष्ट केली. बप्पासाहेब भानुसे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
उत्पन्न वाढीसाठी अनेक शेतकरी अलीकडे फळबागा लागवड करीत आहे. मजुरांची काही अंशी कमी गरज, आणि उत्पन्नाची पारंपारिक पिकांच्या तुलनेत अधिक शाश्वती असलेल्या विविध फळबागांकडे शेतकरी आता वळत आहे. मात्र दिवसेंदिवस होणारा वातावरणीय बदल यात मात्र शेतकरी कोलमडुन जात आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने सर्वत्र दुष्काळजन्य स्थिति आहे. मार्च महिन्यातच भीषण पाणीटंचाईचे संकट शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. कचनेर या परिसरात मोसंबीच्या बागांचे प्रमाण जास्त आहे. अनेक शेतकरी विकतचे टँकरचे पाणी घेऊन फळबागा वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. यातही आर्थिक अडचणीमुळे असफल होत असलेले अनेक शेतकरी नैराश्यात आहे.
यातच कचनेर येथील शेतकरी बप्पासाहेब भानुसे यांनी आपली दोनशे झाडांची मोसंबी बाग पाण्याअभावी सुकत असल्याचे पाहून रविवारी त्यावर कुन्हाड चालविली. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र पाण्याअभावी आता पर्याय नसल्याने त्यांनी हे पाऊल उचल्याचे भानुसे सांगतात.
शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी
पाच वर्षे तळहाताप्रमाणे जपली बाग
शेतकरी बप्पासाहेब भानुसे यांनी पाच वर्षांपूर्वी मोसंबीची बाग लावली होती. दोनशे झाडांची ही बाग त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी तळहाताप्रमाणे जपली. मोसंबी बागेला साधारणतः चार ते पाच वर्षांनंतर फळधारणा सुरू होते.
त्यांना नुकतेच उत्पन्न मिळायला सुरुवात झाली होती. मात्र, पाण्याअभावी त्यांना ही बाग कापून टाकावी लागली. पाच वर्षांचे प्रयत्न व पैसा वाया गेल्याने बप्पासाहेब यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.