पुणे : शेतकऱ्यांच्या मालाची विक्री व्यवस्था सोपी व्हावी आणि जास्ती जास्त माल निर्यात केला जावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून बायर सेलर मीट - शेतमाल निर्यात प्रशिक्षणाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. यावेळी निर्यातदार, निर्यातयोग्य शेतमाल तयार करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतमाल खरेदीदार आणि प्रत्यक्ष शेतकरी असे एकूण २२५ जण सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांना थेट खरेदीदार आणि निर्यातदारांशी संपर्क करता आला.
दरम्यान, आज यशवंतराव चव्हाण प्रबोधिनी (यशदा) येथे पाड पडलेल्या या कार्यक्रमात निर्यातयोग्य शेतमाल उत्पादन, निर्यातदार होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, निर्यातीतील उपलब्ध संधी, शासनामार्फत निर्यातील चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या सोयी सुविधा, शासनाच्या योजना, बँकिंग क्षेत्रातील सेवा, शेतमाल उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी फळे, भाजीपाला व त्यापासून प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अपेडाच्या हॉर्टीनेट प्रणालीवर नोंदणी करावी आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे मत राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, अपेडा मुंबईचे विभागीय प्रमुख तथा उपमहाव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, फलोत्पादन संचालक कैलास मोते, वनस्पती संगरोध केंद्र येथील रश्मी पांडे, पणन मंडळाचे उपसंचालक सतिश वराळे, परकीय व्यपार महासंचालनालयाचे कृष्णा राव, नाबार्डचे व्यवस्थापक अनिल रावल, प्रोक्रॅम लॅबोरेटरीच्या चेतना पवार, बारामती फार्म्स फार्मर प्रोड्युसर कंपनीचे प्रल्हाद वरे हे उपस्थित होते.