Join us

केंद्रीय पथकाची पाहणी; राज्यात दुष्काळाची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2023 11:03 AM

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या पथकाने राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याचे मान्य केले आहे. राज्य सरकारने दिलेल्या अहवालानुसार, ही परिस्थिती प्रत्यक्ष जागेवरही असल्याचे निरीक्षण नोंदवत त्या संदर्भातील अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे समजते.

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या पथकाने राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याचे मान्य केले आहे. राज्य सरकारने दिलेल्या अहवालानुसार, ही परिस्थिती प्रत्यक्ष जागेवरही असल्याचे निरीक्षण नोंदवत त्या संदर्भातील अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे समजते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याने आतापासूनच जनावरांच्या चाऱ्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही या पथकाने दिल्या आहेत.

केंद्र सरकारमध्ये कृषी, जलसंधारण, पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण अशा विविध विभागांमधील बारा सदस्यांचे पथक राज्यातील दुष्काळ पाहणीसाठी १२ डिसेंबरपासून राज्यभर दौरा करत होते. तीन दिवसांच्या या दौऱ्यात केंद्र सरकारच्या प्रतिनिधींची वेगवेगळी पथके विभागनिहाय तयार करण्यात आली होती. त्यानुसार या पथकांनी संबंधित विभागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर या पथकाने शुक्रवारी (दि. १५) पुण्यात बैठक घेतली.

यावेळी बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते.

राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दुष्काळ- राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊसमान झालेल्या ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यात २४ तालुक्यांमध्ये गंभीर, तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.- त्यानंतर पुन्हा १७८ तालुक्यांतील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यामुळे राज्यात एकूण २१८ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या पथकांकडून पाहणी करण्यात येते.

काही तालुक्यांची माहिती मागवली- राज्य सरकारच्या अहवालानुसार, राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याचे निरीक्षण यावेळी या पथकाने बोलून दाखवले.- त्यानुसार राज्य सरकारने जनावरांच्या चाऱ्याच्या तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन आतापासूनच करावे, अशा सूचनाही या पथकाने केल्या.- तसेच राज्य सरकारकडून काही तालुक्यांच्या दुष्काळासंदर्भातील माहिती नव्याने मागितली आहे. ही माहिती दिल्यानंतर त्याचा एकत्रित अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :दुष्काळकेंद्र सरकारशेतकरीपाऊसमहाराष्ट्रराज्य सरकार