शेतकरी नैराश्याच्या घटनांचा मुद्दा राज्यात सध्या गाजत आहे. मात्र योग्य वेळी काळजी घेतल्यास आणि सल्ला व समुपदेशन केल्यास शेतकऱ्यांना नैराश्याच्या खाईतून बाहेर पडून पुन्हा जोमानं कृषी व्यवसाय उभारता येतो.
राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम माहे ऑक्टोबर २०१५ पासून मराठवाडा विभागातील ९ जिल्हे व विदर्भातील ५ जिल्हे असे एकुण १४ जिल्हयांत सार्वजनिक आरोग्य विभाग व महसूल व वन विभाग यांचे शासन निर्णयाव्दारे अंमलात आणण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
प्रेरणा प्रकल्प , शेतकरी समुपदेशन आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत १४ जिल्हयापैकी मराठवाडा विभागातील ९ जिल्हयांचा तर विदर्भ विभागातील ५ जिल्हयांचा समावेश आहे. (जिल्हे- नांदेड, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, लातूर, अकोला, यवतमाळ, वाशिम, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा व वर्धा) यामध्ये नऊ जिल्हयांमध्ये प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत कार्यक्रम राबविण्यात येतो तर उर्वरित पाच जिल्हयांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत कार्यक्रम राबविण्यात येतो.
प्रेरणा प्रकल्प-शेतकरी समुपदेशन आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत गावातील आशांमार्फत सर्वेक्षण करण्यात येऊन नैराश्यग्रस्त लोकांचा शोध घेण्यात येतो व त्यांचे मार्फत पुढील उपचाराकरीता संदर्भित करण्यात येते. या करीता आशांना प्रशिक्षण देण्यात आलेले असुन आपणांस कोणत्याही प्रकाराचा ताणतणाव अथवा नैराश्य वाटत असेल तर आपण आपल्या गावतील आशांशी संपर्क साधावा.
तसेच महाराष्ट्र शासनाची १०४ ही फ्री हेल्पलाईन नं सुरु करण्यात आलेली असुन या मार्फत लोकांचे समुपदेशन करण्यात येते तसेच राज्यामध्ये टेलीमानस या केंद्रशासनाच्या प्रकल्पांतर्गत तीन विभागीय कॉल सेंटर सुरु करण्यात आले असुन (पुणे, ठाणे व बीड) १४४१६ हा टोल फ्री क्रमांक आहे, याव्दारे लोकांना २४X७ मानसिक समुपदेशनाची सेवा देण्यात येत आहे. तसेच राज्यातील ३४ जिल्ह्यामध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविला जातो या मार्फत सुध्दा आपणास मानसिक आरोग्याशी संबंधित उपचार व समुपदेशन करण्यात येते.
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मनशक्ती क्लिनीक सुरु करण्यात आले असुन वैद्यकिय अधिकारी यांचेमार्फत मानसिक आजारांचे निदान व उपचार करण्यात येत आहे. तसेच उपकेंद्र स्तरावर सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मानसिक आजाराविषयक प्रशिक्षण घेण्यात आले असुन त्यांचेमार्फत समुपदेशन व संदर्भ सेवा देण्यात येत आहेत.
तरी शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आपण सदर कार्यक्रमाचा आवश्य लाभ घ्यावा व काही अडचण असल्यास १०४ किंवा १४४१६ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन आपल्या मनातील शंकांचे निरसन करुन घ्यावे किंवा आपल्या जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात संपर्क साधावा.