Join us

विदर्भाच्या ७३ वर्षीय शेतकऱ्याची प्रेरणादायी कामगिरी; सेंद्रिय शेतीत पिकविला ४४५ ग्रॅम वजनाचा टोमॅटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:05 IST

Organic Farming : पातूर तालुक्यातील चरणगाव येथील शेतकरी शालिग्राम गाडेकर यांनी मेहनत व जिद्दीच्या बळावर सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला.

संजय  गोतरकर 

अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील चरणगाव येथील शेतकरी शालिग्राम गाडेकर यांनी मेहनत व जिद्दीच्या बळावर सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला.

७३ वर्षांचे गाडेकर यांनी त्यांच्या शेतामध्ये घेतलेल्या टमाट्याच्या पिकात तब्बल ४४५ ग्रॅम वजनाचे टमाटे लागले आहे. हा विषय सर्वत्र चर्चेचा बनला आहे. या टमाटे उत्पादनाला त्यांना कमी दर मिळत असला तरीही एक लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळण्याची आशा आहे.

शालिग्राम गाडेकर वयाच्या ७३ व्या वर्षी स्वत: शेतात परिश्रम घेऊन सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. गुरांच्या शेणखताचा योग्य वापर करून ते शेतात नैसर्गिक व आरोग्यदायी पिके घेतात. त्यांनी शेतातील ५ गुंठ्यांत गावरान टमाट्याचे पीक घेतले आहे.

सेंद्रिय शेतीची यशस्वी किमया

• शालिग्राम गाडेकर यांनी मागील चार-पाच वर्षापासून त्यांच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने गावरान टमाट्याची लागवड केली आहे. या सर्व शेतीकामात त्यांचे बंधू दिलीप गाडेकर व कुटुंबीय त्यांना पूर्ण सहकार्य करतात. ते पिकावर कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर करत नाहीत.

• गोवंशाच्या शेणखताचा वापर केला जातो, ज्यामुळे शेतमाल पर्यावरणपूरक आणि आरोग्यासाठी सुरक्षित राहतो. शालिग्राम गाडेकर यांच्या शेतातील विविध पिकांमध्ये हरभरा, भुईमूग आणि कांद्याचाही समावेश आहे.

"माझ्या शेतात गावरान, डेरेदार टमाट्याचे पीक सेंद्रिय पद्धतीने घेत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनीही या पद्धतीने टमाटराचे पीक घ्यावे आणि सेंद्रिय शेतीच्या फायद्याचा अनुभव घ्यावा." - शालिग्राम गाडेकर, शेतकरी, चरणगाव.

हेही वाचा : पाच महिन्यांत ३० गुंठ्यांमध्ये घेतले ५ लाख रुपयांचे उत्पन्न; गावरान लसणाचा यशस्वी अंकुश पॅटर्न

टॅग्स :सेंद्रिय शेतीसेंद्रिय भाज्याखतेसेंद्रिय खतशेतीअकोलाशेती क्षेत्रशेतकरीटोमॅटोबाजार