Pune : राज्याचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाळप हंगाम १० दिवस लांबवण्यासाठी मंत्रालय स्तरावर हालचाली सुरू असून राज्याच्या मुख्य सचिवांनी आणि मुख्यमंत्र्यांनी गाळप हंगामाची तारीख २५ नोव्हेंबर पर्यंत वाढवण्याचे आदेश साखर आयुक्तालयाला दिले असल्याची खात्रीशीर माहिती विश्वसनीय सुत्रांनी लोकमत अॅग्रोला दिली आहे.
दरम्यान, हंगाम सुरू होण्यासाठी केवळ ४ दिवस बाकी असून अजून एकाही कारखान्याला गाळपाचा परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे साखर गाळपाबाबत शंका निर्माण झाली असून आज मुंबईत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन निर्णय येण्याची शक्यता आहे. या निर्णयानुसार गाळप हंगाम २५ नोव्हेंबर रोजी सुरू केले जाऊ शकतात अशी माहिती आहे.
मागच्या वर्षी गाळप हंगाम १ नोव्हेंबर रोजी सुूरु झाला होता. पण यंदा हाच गाळप हंगाम २५ नोव्हेंबर रोजी सुरू होण्याची चिन्हे आहेत. गाळपाची तारीख लांबवण्यास अनेक राजकीय नेत्यांचा विरोध असून गाळप वेळेवरच सुरू व्हायला पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजू विचारात घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.
का होत आहे गाळपाला उशीर?विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. पण बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर उसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात स्थलांतर करतात. जर १५ नोव्हेंबर रोजी कारखाने सुरू झाले तर कामगार चार ते पाच दिवस आधीच स्थलांतर करतील आणि त्यांना मतदानासाठी हजर राहता येणार नाही. म्हणून गाळपाची तारीखच पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.