Join us

राज्यातील सिंचन प्रकल्पांची कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश

By मुक्ता सरदेशमुख | Published: November 08, 2023 11:30 AM

आढावा बैठकीत निर्देश..

राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी असणाऱ्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील या सिंचन प्रकल्पांची कामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृहात मंगळवारी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना यासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. राज्याची सिंचन क्षमता वाढण्याच्या दृष्टीने या योजना महत्वपूर्ण असून यासाठी निश्चित कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा. कामे पूर्ण करण्यासंदर्भात जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

किती सिंचन प्रकल्प पूर्ण किती अपूर्ण?

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत 10 प्रकल्प पूर्ण झाले असून 17 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत तर बळीराजा जलसंजीवनी योजनेत 46 प्रकल्प पूर्ण झाले असून 45 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे सर्व प्रकल्प निश्चित कालावधीत पूर्ण होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असून लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :पाटबंधारे प्रकल्पदेवेंद्र फडणवीसशेतकरी