Join us

शेतकऱ्यांना फायदा व्हावा या दृष्टीने जलसंधारण कामांचे नियोजन करण्याचे निर्देश

By मुक्ता सरदेशमुख | Published: September 05, 2023 5:49 PM

शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशा दृष्टीने जलसंधारण कामांचे नियोजन करावे. तसेच लहान मोठे प्रकल्प, धरणातील गाळ काढण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे ...

शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशा दृष्टीने जलसंधारण कामांचे नियोजन करावे. तसेच लहान मोठे प्रकल्प, धरणातील गाळ काढण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. 

राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या धोरणात्मक योजनांच्या अंमलबजावणी च्या अनुषंगाने सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. 

पावसाचा प्रत्येक थेंब अडवता येईल अशा कामांना प्राधान्य द्यावे लागेल. यासाठी आतापर्यंत झालेल्या कामातून काय बदल घडला याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. नव्याने हाती द्यायच्या कामांबद्दल सर्वेक्षण करण्यात यावे जेणेकरून या कामांची उपयुक्तता वाढेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कोकणात भरपूर पाऊस पडतो. पण, उन्हाळ्यात हा परिसर कोरडा असल्याकडे लक्ष वेधत कोकणात जलसंधारणाची अनेक कामे करता येतील. यासाठी कामांचे जुने निकष आणि मापदंड बदलण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सुरू झालेल्या कामांना गती देण्यात यावी. कोकणातील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यादृष्टीने जलसंधारणाच्या उपाययोजनांचा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले..

जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात लहान प्रकल्प, तलावातील गाळ मुक्त मोहिमेला गती देण्यात आली होती. त्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कोयना धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचून त्याची धारण क्षमता कमी झाल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, येत्या उन्हाळ्यात अशा गाळांनी भरलेले जलसाठे, जलस्रोत, नद्या, ओढे-नाले यांना गाळमुक्त करण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. मोठ्या प्रकल्पातून अन्य राज्यांच्या वाट्याचे पाणी सोडल्यानंतर आपल्यासाठी पुरेसा जलसाठा उपलब्ध व्हावा यासाठी या धरणांतील गाळ काढावा लागेल. त्यासाठी वेळेत सर्वेक्षण आणि नियोजन करावे लागेल. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशेतकरीशेतीपाणीधरणपीक