प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीकविमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका व बाजरी पिकांसाठी विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाईची रक्कम १० नोव्हेंबरपासून वितरित होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. मात्र तूर आणि कांदा पिकाला तूर्त २५ टक्के विमा रक्कम मिळणार नाही. याबाबत कंपनीकडून निर्णय प्रलंबित असल्याची माहितीदेखील आशीर्वाद यांनी दिली आहे.
कमी पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाली असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९२ महसूल मंडळे व आठ तालुक्यांतील विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याबाबत पीक विमा कंपनीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यापूर्वीच सूचना केली होती.
मात्र याबाबत विमा कंपनीकडून निर्णय होत नव्हता. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला. कृषी मंत्र्यांशी चर्चा केली. विमा कंपनीच्या प्रतिनिधींची वारंवार बैठका घेऊन विमा रक्कम देण्याबाबत पाठपुरावा केला. तसेच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केल्याची माहितीदेखील प्रशासनाने दिली आहे.
सव्वाशे कोटींचे काय.
मिळालेल्या माहितीनुसार, तूर आणि कांदा पिकांसाठी शासनाने विमा कंपनीकडे चार ते पाच कोटी इतकी विमा रक्कम भरली आहे. जिल्ह्यातील बाधित पिकांच्या सर्व्हेनुसार, तूर आणि कांदा पिकासाठी कंपनीला १२० कोटी रुपये विमा रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे, कंपनीने अद्याप तूर आणि कांदा पिकाबाबत निर्णय घेतलेला नाही. या विमा रकमेसाठीदेखील जिल्हाधिकाऱ्यांना आता पुन्हा शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.