Join us

गुंठ्याच्या शंभराव्या भागाचाही विमा;शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कशी देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 6:30 PM

राज्याचा कृषी विभाग पडला बुचकळ्यात

नितीन चौधरी

पीक विमा काढला पण विम्याची नुकसानभरपाईची रक्कम ५, १०, २० रुपये मिळाली, अशी तक्रार शेतकऱ्यांकडून होते. मात्र, ही रक्कम विमा संरक्षित शेती क्षेत्र व रक्कम यावर ठरते. खरीपपीक विमा योजनेत काही अर्जदारांनी १ चौरस मीटर, गुंठ्याचा शंभरावा भाग, दहावा भाग इतक्या क्षेत्राचाही विमा काढला आहे. राज्यात असे ६ हजार १७५ अर्जदार पडताळणीत आढळले असून, त्यांची विमा संरक्षित रक्कम १०० रुपयांपेक्षाही कमी आहे. तर एक हजारांपेक्षा कमी विमा संरक्षित रक्कम असलेल्यांची संख्या सुमारे सव्वा लाख आहे. त्यामुळे या अर्जदारांना नुकसानभरपाई एक हजारांपेक्षा कमीच मिळणार असल्याने रक्कम कमी मिळणार आहे.

खरीप पीक विमा योजनेत नुकसानभरपाईची रक्कम विमा संरक्षित शेती क्षेत्र व रक्कम यावर ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम कमी मिळाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्यानंतर राज्य सरकारने २०१९ मध्ये शासन निर्णय जारी केला. त्यानुसार क्षेत्र व रक्कम जास्त असल्यास व विमा निकषांनुसार नुकसानभरपाई १ हजारांपेक्षा कमी येत असल्यास उर्वरित रक्कम राज्य सरकार भरून शेतकऱ्याला १ हजार रुपये देण्याचे ठरले आहे. मात्र, विमा संरक्षित क्षेत्र व रक्कम १ हजारांपेक्षा कमी असल्यास मिळणारी नुकसानभरपाई कमीच मिळते.

५० हजारांपर्यंत भरपाई

विमा नुकसानभरपाई ही पेरणी न होणे, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, पीक कापणी प्रयोग, काढणी पश्चात नुकसान या पाच प्रकारांसाठी दिली जाते. विमा संरक्षित रकमेच्या ५० टक्के भरपाई निश्चित झाल्यास ४ रुपयांच्या विमा संरक्षित रकमेनुसार ही भरपाई केवळ १ रुपया येईल. त्यामुळे अशा परिस्थितीत राज्य सरकारच्या २०१९च्या शासन निर्णयाचा १ हजार रुपयांचा निकष लागू होत नाही. त्यामुळे विमा नुकसानभरपाई कमी मिळाल्याची ओरड होते. प्रत्यक्षात विमा संरक्षित रक्कम व क्षेत्र कमी असल्यानेच नुकसानभरपाई कमी मिळते. त्यामुळे काही शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत नुकसानभरपाई मिळालेली असतानाही केवळ काही अर्जदारांमुळे योजना बदनाम होत असल्याचे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे

प्रमाण केवळ ०.७५%

राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा उपलब्ध करून दिल्याने १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवला. सुमारे १ लाख २७ हजार ५८० शेतकऱ्यांची विमा संरक्षित रक्कम १ हजारांपेक्षा कमी आहे. एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत ही संख्या केवळ ०.७५ टक्के आहे. अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई १ हजार रुपयांपेक्षा कमी मिळणार आहे.

विमा संरक्षित रक्कम ४ रुपयांपासून ९८ रुपयांपर्यंत

  • राज्य सरकारने नुकतीच मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीत पावसाच्या खंडामुळे उत्पादनात घट आल्याने नुकसानभरपाईच्या २५ टक्के अग्रीम रक्कम दिली आहे. यात काही शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत रक्कम मिळाली आहे. 
  • अंतिम पीक काढणी अहवालानंतर उर्वरित ७५ टक्के रक्कम मिळणार आहे. मात्र, विमा संरक्षित क्षेत्र व रक्कम १०० रुपयांपेक्षा कमी असल्याचे सुमारे ६ हजार १७५ अर्ज कृषी विभागाने केलेल्या पडताळणीत सापडले आहेत. 
  •  यात काही अर्जदारांनी गुंठ्याच्या शंभराच्या भागाचा विमा काढला आहे. तर काहींनी गुंठ्याचा दहावा भाग, अर्धा गुंठा अशा क्षेत्राचा विमा काढला आहे. पीक विम्यासाठी अर्ज करताना किमान व कमाल मर्यादा नसल्यानेच एवढ्या कमी क्षेत्राचाही विमा उतरवला जातो. 
  • अर्ज केल्यावर एका सुत्रानुसार क्षेत्रावर तसेच पिकाच्या प्रका- रानुसार विमा संरक्षित रक्कम ठरते. या अर्जामध्ये सर्वात कमी विमा संरक्षित रक्कम ४ रुपयांपासून ९८ रुपयांपर्यंत आहे.
टॅग्स :पीक विमाशेतकरीखरीप