Join us

फळपीक विमा योजनेंतर्गत आंबा बागायतदारांना ८१ कोटींचा विमा परतावा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2023 12:18 PM

२४ हजार ६१३ शेतकरी विमा परताव्यासाठी पात्र ठरले आहेत. गेल्या हंगामात आंबा उत्पादन अत्यल्प असल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत ८१ कोटी २४ लाख २८ हजार ३४ रुपयांचा परतावा जिल्ह्याला जाहीर झाला असून, २४ हजार ६१३ शेतकरी विमा परताव्यासाठी पात्र ठरले आहेत. गेल्या हंगामात आंबा उत्पादन अत्यल्प असल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परतावा जाहीर झाला असला तरी प्रत्यक्ष खात्यात रक्कम कधी जमा होणार याबाबत बागायतदारांना प्रतीक्षा आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र शासनाने जाहीर केली. जिल्ह्यातील २६ हजार २८२ आंबा व ५८३५ काजू उत्पादक मिळून एकूण ३२ हजार ११७ बागायतदार शेतकऱ्यांनी एकूण १७ हजार ६२२.४३ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला होता. काजू उत्पादक ४ हजार ५२ बागायतदारांना सात कोटी ४४ लाख ७५ हजार ९५४ तर आंबा उत्पादक २४ हजार ६१३ बागायतदारांना ७३ कोटी ७९ लाख ५२ हजार ८० रुपयांचा परतावा जाहीर झाला आहे.

हवामानातील बदलामुळे एकूणच आंबा उत्पादन अत्यल्प होते. उत्पादनासाठी केलेला खर्चही बागायतदारांचा न निघाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे बागायतदारांना विमा परतावा रकमेची अपेक्षा होती. दरवर्षी ऑगस्टमध्ये विमा परतावा जाहीर होतो. यावर्षी परतावा जाहीर करण्यास विलंब झाला आहे. शिवाय शासनाकडून हप्त्याचे पैसे न जमा झाल्याने बागायतदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील कर्जदार ४८८५ काजू उत्पादक व ९५० विना कर्जदार मिळून पाच हजार ८३५ काजू उत्पादक शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले. होते. यापैकी चार हजार ५२ काजू, उत्पादक विमा योजनेसाठी पात्र ठरले आहेत. आंबा उत्पादकांपैकी २३,२२९ कर्जदार तर ३,०५३ बिगर कर्जदार अशा २६,२८२ आंबा बागायतदारांपैकी २० हजार ५६१ बागायतदार विमा परताव्यासाठी पात्र ठरले आहेत.

औषधांचा खर्च फुकटगेल्या हंगामात पालवीचे प्रमाण सर्वाधिक होते. पहिल्या टप्प्यात काही झाडांना मोहोर आला, परंतु हे प्रमाण अवघे पाच ते सहा टक्के होते. त्यातही कीडरोग, बुरशी, तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव वेळोवेळी झाला. काही बागायतदारांकडे आंबाच नसल्याने कीटकनाशक फवारणी, राखणीसाठी केलेला खर्च भागविणे अशक्य झाले होते.

विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून ४५ दिवसात बागायतदारांना विमा परतावा रक्कम प्राप्त होणे आवश्यक आहे; मात्र १२२ दिवसांनी परतावा जाहीर करण्यात आला. दरवर्षी हवामानातील बदलाचा परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर होतो. बागायदार मोठ्या संख्येने विमा योजनेत सहभागी होतात मात्र महसूल मंडळातील ट्रीगर अॅक्टिव्हेट होत नसल्याने नुकसान ग्राह्य धरले जात नाही त्यामुळे अपेक्षित परतावा मिळत नाही. - सुनील रेवाळे, आंबा बागायतदार

टॅग्स :आंबापीकपीक विमाकोकणरत्नागिरीशेतकरीशेतीफळे