Join us

Integrated Farming : एकात्मिक शेती पद्धती संशोधन 'मॉडेल'; शेतकऱ्यांना होणार आर्थिक नफा कसा ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:38 IST

Integrated Farming : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पांतर्गत एका हेक्टरमध्ये ३ लाख ७१ हजार रूपये आर्थिक मिळकतीचे 'मॉडेल' तयार केले आहे. वाचा सविस्तर

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकात्मिक शेती(Integrated Farming) पद्धती संशोधन प्रकल्पांतर्गत एका हेक्टरमध्ये ३ लाख ७१ हजार रूपये आर्थिक मिळकतीचे 'मॉडेल' तयार केले आहे.

कृषी विद्यापीठाच्या या मॉडेलला राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) मान्यता दिली आहे. एक हेक्टर शेतीवर ७० टक्के पीक पद्धती, २० टक्के फलोत्पादन व १० टक्के पशुसंवर्धन या स्वरूपात कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर मॉडेल विकसित करण्यात आले आहे.

यात खरिपातील कपाशी १५ गुंठे, भुईमूग १५ गुंठे, सोयाबीन सहा ओळी व तूर एक ओळ अशी पेरणी करण्यात आली आहे.

खरिपाचे हे पीक काढल्यानंतर येथे कांदा १५ गुंठे, गावार, मधुमका, तसेच रबीतील ओवा १७ गुंठे या पद्धतीने घेण्यात येत आहे. या पिकांसह ज्वारी, लूसण वैरण ५ गुंठे, गहू, उन्हाळी मूग १० गुंठे, जवस, तीळ, उडीद अशी पिके नियोजनबद्ध पद्धतीने घेण्यात येत आहेत.

फलोत्पादनात सीताफळ, त्यामध्ये शेवगा अशी लागवड करण्यात आली आहे. पशुधनासाठी व्यवस्था करण्यात आली असून, कावेरी कोंबडी पालन व विदर्भातील बेरारी शेळी व सैवाल गाय संगोपन येथे केल्या आत आहे, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. जे. पी. देशमुख यांनी दिली.

या सर्व पिकांच्या उत्पादनासाठी एकूण ६ लाख ६७ हजार रूपये खर्च लागतो. त्यातून खर्च वजा करता ३ लाख ७१ हजार आर्थिक मिळत होत असल्याचे अर्थशास्त्रीयदृष्ट्या आकडेवारीसह हे उत्पन्न काढण्यात आले आहे.

विदर्भाच्या बेरारी शेळीचे संगोपन

* या प्रकल्पातंर्गत खास करून विदर्भातील जातीवंत बेरारी शेळीचे संगोपन करण्यात आले आहे ही शेळी विदर्भातील आहे.

* सैवाल गायीचेही संगोपन करण्यात आले आहे. कावेरी कोंबडीचे संगापेनही करण्यात आले आहे.

* नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास याची आर्थिक पूर्तता या माध्यमातून केली जाणार आहे पशूसंवर्धनासाठी येथे गवताची व्यवस्था करण्यात आली आहे.हे ही वाचा सविस्तर : NCOL Bharat Organics : एनसीओएल देशातील सर्व प्राथमिक कृषी पतसंस्थांना सेंद्रीय मिशनशी जोडणार

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी विज्ञान केंद्रशेतकरीशेती