दोन आठवड्यांपासून ढगाळ वातावरण व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस(rain) होत आहे. पिकांच्या वाढीसाठी पाऊस पोषक असला तरी कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. बुलढाणा जिल्ह्यात यंदा सर्वाधिक म्हणजेच चार लाख २९ हजार २२४ हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे (soyabean) आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या सोयाबीनवर आता कीड व रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. वेळीच व्यवस्थापन न केल्यास पिकांचे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
ढगाळ वातावरणानं सोयाबीन पिवळे
जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून ढगाळ वातावरण व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पिकांच्या वाढीसाठी पाऊस पोषक असला तरी कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. जिल्ह्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल झाला. मात्र, पुढील वाटचाल मंदावली. त्यामुळे सोयाबीनच्या पेरण्या उशिराने सुरू झाल्या. मात्र, सिंचनाची सुविधा असलेल्या शेतात पहिल्या टप्प्यात पेरणी झाल्याने तेथील पिके आता वाढीच्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत दोन आठवड्यांपासून सुरू असलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे काही भागात चक्रीभुंगा व उंटअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.
शेतात पाणी साचले आहे त्या भागात सोयाबीनची पाने पिवळी पडत असल्याचे दिसून येते.
चक्रीभुंगा आढळल्यास काय कराल?
चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे आढळणारी कीडग्रस्त पाने, वाळलेल्या फांद्या आतील किडीसह नष्ट कराव्यात, शिवाय सोयाबीन पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे महत्त्वाचे आहे. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास कृषितज्ज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशकांची फवारणी करावी.
अंड्यातून निघालेल्या उंटअळ्या सुरुवातीला पानाचा पृष्ठभाग कुरतडतात व पाने जाळीदार करतात. फक्त शिराच शिल्लक ठेवतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास उंटअळ्या फुले व शेंगा खातात, त्यामुळे पिकांचे नुकसान होते. यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
निंबोळी अर्काचा परिणाम काय?
1. सुरुवातीच्या काळात कीटकनाशकाच्या फवारणीऐवजी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाद्वारा देण्यात येतो. किडीच्या सुरुवातीच्या काळात निंबोळी अर्काची फवारणी केल्यास किडींवर नियंत्रण मिळविता येत असल्याने फवारणी उपयुक्त ठरते.
2. चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावातील कीडग्रस्त पाने पाळलेल्या फांद्या आतील किडीसह नष्ट कराव्यात व सुरुवातीला पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
3. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास म्हणजे प्रतिमीटर ओळीत १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कीडग्रस्त झाडे आढळल्यास फवारणी करावी.
4. उंटअळी आढळल्यास पक्षी थांबे उभारा
5. प्रोफेनोफॉस ५० टक्के इसी २० मिली अधिक १० लिटर पाणी किंवा क्लोरेंनटानीफोल १८.५ एससी २ मिली अधिक १० लिटर पाणी किंवा थायमिथोकगझॉम १२.६ टक्के अधिक लॅम्बडा साय- हेलोर्थीन ९.५ टक्के २.५ मिली, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
6. शेतात एकरी ८ ते १० पक्षी थांबे उभारावे, त्यावर पक्षी थांबून ओळीतील अव्ळ्या खातात. सुरुवातीला पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
7. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास म्हणजे प्रतिमीटर ओळीत चारपेक्षा जास्त अळ्या आढळल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी.
8. लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन योग्य प्रमाणात फवारणी करावी, अनेक रसायनांचे एकत्र मिश्रण करून फवारणी करणे टाळावे.
9. फवारणी करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
ही फवारणी करणे आवश्यक
ढगाळ वातावरण व दोन आठवड्यांपासून सुरू असलेला पाऊस यामुळे सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे सल्ल्याने एकात्मक व्यवस्थापन करावे. किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळल्यास फवारणी करावी.
■ प्रोफेनोफॉस ५० टक्के इसी २० मिली, १० लिटर पाण्यात किवा क्लोरॅनटानीफोल १८.५ एससी ३ मिली, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
■ इन्डोक्सीकार्ब १५.८ एससी ६.६ मिली, १० लिटर पाण्यात किंवा थायमिथोकगझॉम १२.६ टक्के अधिक लॅम्बडा सायहेलोर्थीन ९.५ टक्के २.५ मिली, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
■ फवारणीमुळे पिकावरील रोगराई नियंत्रणात येते.
- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा