रविंद्र शिऊरकर
एक एकरमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेल्या शेतकऱ्याने आंतरपीक म्हणून पपईची लागवड केली. मात्र बाजारभाव नसल्याने पपई पिकाची तोडही शेतकऱ्याच्या नाकी नऊ आणत असल्याचे चित्र आहे. एकीकडे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ड्रॅगन फ्रुट शेतीत पपईची लागवड केली होती. मात्र दरच नसल्याने पपईची शेतकऱ्यांनी तोडणी थांबवली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर गावातील शेतकऱ्याचे हे उदाहरण आहे. या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीत आधुनिक जोड देत शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली. मात्र मराठवाडा आणि ऊन हे काय नवीन नाही. उन्हाळयात ड्रॅगनवर सन बर्निंगचा मोठा प्रादुर्भाव होतो. यामुळे उष्णतेपासून ड्रॅगनचे संरक्षण व्हावे, तसेच आंतरपीक म्हणून दोन पैसे पण येतील. या अपेक्षेने शेतकऱ्याने ड्रॅगनमध्ये पपईची लागवड केली. मात्र आता पपईला बाजारभाव अवघा ५-८ रुपये असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. स्थानिक व्यापारी देखील बाजारभावापेक्षा १-२ रुपये कमी दराने मागणी करत असल्याने शेतकऱ्यांनी पपई तोड थांबवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पपईची आवक वाढली असून मात्र बाजारभाव संतुलित नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. दिवसेंदिवस फळ पिकांवर होणाऱ्या विविध किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी निर्विष्ठा, किटकनाशक, बुरशीनाशक वापरतात. त्यात अलिकडे किटकनाशक, बुरशीनाशक यांच्या किंमती वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झालेली आहे. यामुळे आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी बाजारभाव नसल्याने आता जेमतेम खर्च निघावा अशी आशा व्यक्त करत आहे.
पपईची तोडणीची हिंमत नाही...
एक एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली असून या पिकाला उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी आंतरपीक म्हणून पपईची लागवड केली. दरम्यानच्या काळात धुई, अवकाळी यांचा सामना करत खते, फवारण्या आदी केल्या, यात मोठा खर्चही झाला. किमान खर्च निघेल ही अपेक्षा होती. मात्र बाजारभाव ढासळल्याने आता पपईची तोड करण्याची हिंमत देखील उरली नसल्याची खंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शेतकरी हर्षवर्धन रुस्तुम भोसले यांनी व्यक्त केली आहे.