वेगवेगळ्या ठिकाणाहून गुरांची चोरी करणारी टोळी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून ११ म्हैशीसह एकूण १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील निंभोरा, फैजपूर, मुक्ताईनगर, रावेर यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड ग्रामीण व मध्यप्रदेशातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हशींची चोरी झाली होती. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी निंभोरा पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. यातील संशयित हे मध्यप्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले.
तसेच यातील संशयित तुकाराम रुमालसिंह बारेला (रा. बोरी, जि. बऱ्हाणपूर) हा यावल येथे असल्याची माहिती सपोनि हरिदास बोचरे यांना मिळताच त्यांनी फैजपूरचे सपोनि नीलेश वाघ यांना माहिती दिली. त्यानुसार त्यांनी संशयित तुकाराम बारेला याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने म्हशी चोरल्याची कबुली दिली.
इतर संशयितांच्या शोधार्थ पथक मध्यप्रदेशात रवाना झाल्यानंतर पथकाने धर्मेंद्र दुरसिंग बारेला (रा. ढेरिया, जि. खंडवा), शांताराम बिल्लरसिंह बारेला (रा. हिवरा, जि. बऱ्हाणपुर), सुभाष प्रताप निंगवाल (रा. दहिनाला, जि. बऱ्हाणपुर), मस्तीराम काशीराम बारेला (रा. न्हावी, ता. रावेर) यांच्या चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ११ म्हशी, २ बोलेरो वाहने व दोन दुचाकी असा एकूण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चार जिल्ह्यातून हद्दपार
संशयित चोरट्याने एकूण दहा गुन्ह्यांची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या धर्मेंद्र बारेला याच्याविरुद्ध मध्यप्रदेशात १४ गुन्हे दाखल असून पंधना पोलिस ठाण्यामध्ये तो हिस्ट्रीशीटर आहे. तसेच बऱ्हाणपूर, खंडवा, खरगोन, हरदा या चार जिल्ह्यातून त्याला तडीपार करण्यात आले आहे. तपासादरम्यान ६० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यावरुन ही टोळी मध्यप्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाली होती.