Irrigation projects :
मुंबई :
जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये विदर्भ, मराठवाड्यातील २१ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शिवणी टाकळी (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर), पळसखेडा (ता. जि. जालना) या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या दोन प्रकल्पांच्या ६ हजार ८४९ हेक्टर क्षेत्रावर सिंचन निर्माण होणार आहे.
तसेच, पार गोदावरी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी प्रथम सुधारित मान्यता देण्यात आली. पार या पश्चिम वाहिनी नदीचे पाणी या योजनेच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे.
वर्धा जिल्ह्यातील आष्टी, वाढोणा पिंपळखुटा या नवीन उपसा सिंचन योजनांना मान्यता देण्यात आली. तसेच, निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत महाजनको यांच्यामार्फत ७३२ हेक्टर जलाशयाच्या पृष्ठभागाचा वापर करून तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे.
यामधून अंदाजे ५०५ मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकणार असून, या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली. काळू प्रकल्प ठाणे, उल्हासनगर, डोबिंवली या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी फायदेशीर ठरणारा आहे.
धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लागणार
• महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत निम्न खैरी प्रकल्प (ता. परंडा, जि. धाराशिव), रामनगर (ता. उमरगा, जि. धाराशिव), दिंडेगांव लघु पाटबंधारे प्रकल्प (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) आणि जांब साठवण तलाव (ता. भूम, जि. धाराशिव) या प्रकल्पांना भूसंपादनाकरिता सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
• या प्रकल्पांमुळे २ हजार १५८ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.