राज्यातील बहुतांश ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षात मक्याला चांगला भाव असल्याने यंदाही या पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. मात्र, राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतात तण उगवणे, पिके पिवळी पडणे, मुळांना बुरशी येणे तसेच लष्करी अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे.मक्यावर अमेरिकन लष्करी अळी आली असल्यास शेतकऱ्यांना कृषी विभागाने काही खबरदारीचे उपाय सांगितले आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी जाणून घ्या.
पिकांवर अमेरिकन लष्करी अळी आढळून आल्यास पिकांवरील त्याचा प्रादुर्भाव ओळखून अळीच्या वाढीच्या पहिल्या तीन अवस्थांमध्ये योग्य उपाययोजना केल्यास नियंत्रण करणे सोपे होते व नुकसान पातळी कमी ठेवता येते.भौतिक नियंत्रण१) शक्य असल्यास अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत.२) किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्यामध्ये वाळू टाकावी. असे केल्याने अळीला वाढीच्या भागातील खाण्यापासून परावृत्त करता येईल, शेंडा तुटणार नाही.
जैविक नियंत्रणअंड्यावर उपजीविका करण्याऱ्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची एकरी २०,००० अंडी दहा दिवसांच्या अंतराने तीनवेळा शेतात संध्याकाळी सोडावीत. किंवा जैविक बुरशीनाशक नोमुरिया रिलाय ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. किंवा इपीएन (उपलब्ध असल्यास) किंवा मेटारायझियम अनिसोप्ली ६ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारावे.
रासायनिक नियंत्रण
- अळीच्या वाढीच्या लवकरच्या अवस्थांमध्ये (१ ते ३) कडुनिंबावर आधारित कीटकनाशक ॲझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) ५ मि.लि. किंवा थायमेथोक्झाम (१२.६%) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) या संयुक्त कीटकनाशकाची ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
- प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास, इमामेक्टीन बेन्झोएट(५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून मधुमक्यावर फवारावे.
- विषारी आमिषाचा वापर भाताचा भुसा १० किलो आणि गूळ २ किलो पाण्यात एकत्र करून त्याचे गोळे तयार करावेत. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) १०० ग्रॅम मिसळावे. या मिश्रणाच्या लहान गोळ्या तयार करून मक्याच्या पोंग्यात टाकाव्यात.