शरद यादव
कोल्हापूर : निवडणूक कोणतीही असो, मैदानात झाडून सारे साखरसम्राट उतरतात. सभा, प्रचार, पदयात्रा, जेवणावळी, पैसा याचा बेसुमार वापर होतो. यात हार होवो अथवा जीत, पुढच्या निवडणुकीला पुन्हा लांग घालून हे सम्राट तयार असतात.
राजकारणासाठी एवढे पैसे खर्च करण्यासाठी येतातच कुठून, हा प्रश्न सामान्यांना कायमच सतावत असतो. याचे उत्तर काटामारीच्या मलिद्यात लपले आहे.
शेतकरी कधीच उसाच्या वजनकाट्याबाबत गंभीर नसतो. नेमका याचाच फायदा या मंडळींनी घेतला आहे. काटामारीतून अडीच टक्के ऊस गायब होत असल्याची शंका व्यक्त होत आहे. असेच दाखविण्याचे नाटक करत असल्यानेच काटामारीच्या लुटीत शेतकरी भिकेकंगाल होत आहे.
काटामारीच्या खेळात केवळ शेतकरीच मरतो असे नाही. तोडकऱ्यांसह वाहतूकदारांनाही याचा फटका बसतो. एका खेपेतून दोन टन मारले तर तेवढे पैसे तोडकरी व वाहतूकदारांचेही कमी होतात.
काही लोकांची घरे भरण्यासाठी सर्व कष्टकऱ्यांचे रक्त शोषून घेण्यासारखाच हा प्रकार आहे. अनेक वाहतूकदार खासगीत वाहनाचे वजन करायला तयार नसतात, परंतु कारखानदार आपल्याही नरड्यावर पाय देत आहेत, याचे भान त्यांना नसते.
खासगी काटावाल्यांचे कारखाना कनेक्शन असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळेच खासगीवर वाहन वजनासाठी गेले की त्वरित कारखान्याला त्याची माहिती कळते.
इचलकरंजी जवळील एक काटेवाला तर मोफत वजन करून देत होता. तो काय हरिश्चंद्र राजाचा वारसदार नव्हता तर कारखान्याकडून त्याला खेपेला हजार रुपये मिळत असल्याची चर्चा होती.
६० टक्के ऊस रात्रीच कसा उतरतो, याचे कोडे
साखर हंगामाचा अभ्यास केला तर ६० टक्के ऊस रात्रीचा उतरत असल्याचे दिसून येते. काटामारीचा कारभारही रात्रीच जास्त चालत असल्याचा अंदाज व्यक्त्त होत आहे. कोणी वजन करून आले किंवा शासनाचे पथक आले तरी दिवसा काही हालचाल करायची नाही. रात्री ११ नंतर मात्र ठरलेला कार्यक्रम पूर्ण करायचा, असा 'रात्रीस खेळ चाले...' प्रकार सुरू आहे.
अगोदर उसाचे वजन करा; नंतर खुशाल पाळीला लावा
ऊस तुटल्यानंतर काही तासांत कारखान्यात जातो, असे होत नाही. तुटल्यानंतर एक ते दोन दिवस शेतातच वाळतो. कारखान्याच्या अड्यात गेल्यावर चालकाला टोकन दिले जाते. यानंतर १२ ते २४ तासांनी नंबर येतो. यादरम्यान वाळल्यामुळे उसाचे वजन कमी होते. यासाठी अहुयात आल्यावर अगोदर वाहनाचे वजन करावे; नंतर ते पाळीला लावावे. जेव्हा नंबर येईल तेव्हा उतरून घ्या. यात शेतकऱ्यांचे हित आहे; परंतु असे करण्यास एकही कारखानदार तयार नाही.
कागल तपासणी नाक्यातून ऊस वाहतूक का वगळली सांगा?
कागल येथे अदानी कंपनीचा खासगी एकात्मिक तपासणी नाका डिसेंबरमध्ये सुरू झाला. या नाक्यावर सर्व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे वजन व कागदपत्रांची तपासणी होते. ऊस वाहतूकसुद्धा मालवाहतूकच आहे. या नियमाने उसाची वाहनेही येथे तपासण्यास सुरू झाले; परंतु नाक्यावरचे वजन व कारखान्याचे वजन यात तफावत येत असल्याची चर्चा सुरू झाली. याचा धोका ओळखून केवळ चारच दिवसांत उसाची वाहने तपासणे बंद करण्यात आले. याबाबत वजनातील फरकाची पावतीही व्हायरल झाली होती. नाक्यावरील उसाची तपासणी कोणी बंद केली, याचा शोध आता शेतकऱ्यांनीच घ्यावा.
'अंकुश'चा अनोखा प्रयोग
आंदोलन अंकुश या संघटनेने गत हंगामात लोकवर्गणीतून शिरोळजवळ काटा उभारला. गत हंगामात २६०० तर चालू हंगामात ११०० वाहनांचे वजन केले आहे. यामुळे एकरी पाच टनांपर्यंत लाभ झाल्याचे शेतकरी सांगतात.
वजन-काटे तपासणी करणाऱ्या भरारी पथकात आम्हीही काम केले आहे; परंतु एखाद्या कारखान्यावर छापा टाकण्यास गेल्यावर तेथील अधिकारी आमच्या स्वागताला गेटवर हजर असायचे. ५० किलोची वजने काट्यावर ठेवून तपासणीचे नाटक पूर्ण व्हायचे व काटा बिनचूक असल्याचे अगोदरच तयार केलेले प्रमाणपत्र दिले जायचे. हा सगळा खुळ्यांचा बाजार आहे. काटे पकडायचेच असतील तर त्यासाठी शासनाने सॉफ्टवेअर तयार करावे. कोणतीही तांत्रिक माहिती नसणारे शासनाचे कर्मचारी काटामारी रोखूच शकत नाहीत. - रूपेश पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड
अधिक वाचा: साखर चवदार पण कारखान्यांची काटामारी दमदार; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर