Join us

जास्त पाण्याने कांद्याचं रोप मरतंय? काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 3:15 PM

कांद्याला भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी केली कांदा लागवड, पीक वाचवण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला...

कांद्याला सध्या चांगला भाव असल्यामुळे भविष्यात चांगले उत्पन्न हाती लागेल, या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. परंतु, अवकाळीचे पाणी कांदा पातीला लागल्यामुळे पात पिवळी पडत आहे. तसेच बुंध्याच्या जाडीवर परिणाम होत आहे. त्यामुळे त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

किरकोळ बाजारात सध्या कांदा कमी असल्यामुळे ३० पासून ४० रुपये प्रति किलोपर्यंत भाव पोहोचला तर बंगळुरूमध्ये (कर्नाटक) ५० रुपये किलो विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पिके काढून कांदा लागवड सुरू केली आहे. तसेच ऊस, मोसंबी, डाळिंब, शेवगा या पिकांतही कांद्याच्या आंतरपीक लागवडीला सुरुवात झाली आहे.

रोपाची मुळे सडू लागली

शेतकरी कांदा लागवडीसाठी मध्यम ते। भारी जमिनीची निवड करतात. परंतु, काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीतील पाणी जिरायला उशीर लागला. यामुळे कांद्याच्या बुंध्यावर परिणाम होऊन जाडी कमी होऊन मुळ्यादेखील सडत आहेत. दरम्यान, हे प्रमाण थांबण्यासाठी ह्युमिक अॅसिड, बुरशीजन्य औषधांच्या वापराचा सल्ला कृषीतज्ज्ञ देतात.

कांदा रोपाची लागवड केल्यानंतर पातीला पाणी न लागू देणे। ही शेतकऱ्यांची जबाबदारी असते. परंतु, अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पातीत पाणी शिरले आहे. यामुळे कांद्याची पात हळूवार पिवळी पडायला लागली, पीळदेखील वाढला आहे. रोपाच्या मरीने उत्पादनावर परिणाम होणार आहे. लिंबागणेश व परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. - भारत रंधवे, शेतकरी, बीड

कांद्याच्या पातीला पाणी लागल्यामुळे कांदा मरीची संख्या वाढली आहे. सरासरी कांद्याचे वजन ६० ग्रॅमपर्यंत असते. यामुळे उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याचे कृषी अभ्यासक सांगत आहेत.

मॅन्कोझेब व कार्बनडाझियम संयुक्त बुरशीनाशक, पीक वाढीच्या स्थितीनुसार २० ते २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. धुके कमी झाल्यानंतर कांदा पिकाची मर आपोआप नियंत्रणात येईल. खरिपातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जास्त दिवस कांदा न ठेवता विक्री करावा; अन्यथा कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढते. कांदा व इतर अवकाळीग्रस्त पिकांवर कार्यशाळा आयोजित करणार आहोत.- बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी बीड

शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली

अवकाळी पाऊस व धुके कांदा पिकाला घातक ठरत आहे. त्यामुळे कांदा उत्पादनात घट होणार असल्याचे कृषीतज्ज्ञ सांगतात. खरीप हंगाम हाती न लागल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची मोठी अपेक्षा आहे. परंतु, या पिकांनी देखील धोका दिल्यास बळीराजाची डोकेदुखी वाढणार आहे.

टॅग्स :कांदापाऊसशेती क्षेत्रशेतकरी