रविंद्र शिऊरकर
थंड असणारे आणि नितळ दिसणारे जारचे पाणी घराच्या उंबरठ्या पर्यंत पोहचं होतं. धातूंच्या विविध आकाराचे भांडे घराघरात अलगद वावरायला लागले. मात्र या सर्वांत कुंभार बांधवाने केलेली मातीची मडके, गाडगे, माठ, रांजण, हे कालबाह्य होत गेली.
पूर्वी गावागावात भल्या पहाटे १० - २० घरे मिळून असलेल्या एका नळाद्वारे पाणी भरतांना वाद व्हायचे. त्यातून मिळालेले पाणी हंड्यात साठवून ठेवले जायचे. त्यापैकी दररोज माठात आणि रांजनात पिण्यापूरते पाणी टाकून ते नैसर्गिक रित्या थंड होत पिण्यास घेतले जायचे. त्यामुळे घराघरात कुंभाराने बनवलेले मातीचे माठ, रांजण असायचे. कालांतराने त्याला तुटी (नळ) यायला लागले. मात्र अलीकडे जसा आपल्या राहणीमानामध्ये बदल होत गेला तशीच स्टीलची भांडी, आधुनिक फिल्टर हे घरामध्ये बसायला लागली.
शहरातील हा परिणाम ग्रामीण भागातही दिसून आला. यात अलीकडे जारचे थंड पाणी आले. घरोघरी जारच्या पाण्याचा उपयोग केला जाऊ लागला. गावोगावी, शहरात सध्या हे जारचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले गेले आहे. पण या सर्वांत आपण आपल्या मडक्यांना विसरत चाललो आहे. परिणामी कुंभार समाजातील अशिक्षित या मडकांचे व्यवसाय करणारे लोक आज घरी बसून आहे. तर काहींनी गवंडी काम, मोलमजुरी, एम आय डि सी, अशा विविध कामांच्या ठिकाणी आपले बिऱ्हाड स्थलांतरित केले आहे.
आम्ही वडिलोपार्जित माठ रांजण बनविण्याचे काम करतो. माती घडवायची मंग शिक्षण कशाला लागतं म्हणून अशिक्षीत राहिलो. आता आमच्या या मडक्या गाडग्यांना फक्त अंत्यविधीसाठी खरेदी केलं जातं.
- नवनाथ प्रभाकर गवळी (शिऊर ता.वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर)
आधी सर्व घर काम करायचं. माती आणणे, भिजवणे, चरका, अशी विविध काम असायची. मात्र बैल पोळाच्या वेळेस मातीचे पूजेसाठी बैल, दिवाळीत पणती, अक्षय तृतिया ला केळी (छोटे मटके), हे विकले जाते. याव्यतिरिक्त माठ, रांजण ज्यात दोन पैसे अधिक मिळतात अशा वस्तू जास्त कुणी घेत नसल्याने आता एक माणूस सुद्धा हे बनवू शकतो त्यामुळे कुटुंबातील बाकी सदस्य आता बाहेर पडून दुसरे काम करतं आहे.
- दादाभाऊ कारभारी गवळी (शिऊर ता.वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर)