राज्यभरात उन्हाळा तीव्र स्वरूप घेताना दिसत असून पाणटंचाईची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. दुष्काळी परिस्थिती जाणवण्यास सुरुवात झाली असून फळबागांना पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात फळबागा जगविण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान आहे. शेतकऱ्यांना आता फळबाग जगवताना कसरत करावी लागणार असून, फळबागांसाठी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
उन्हाळा सुरू झाला की, शेतातील विहिरी, कूपनलिकांची पाण्याची पातळी कमी होते. याचा मोठा फटका फळबागांना बसत असतो. फळबागांमध्ये तालुक्यात काही प्रमाणात आंबा, द्राक्ष, बोर, डाळिंब, सीताफळांचा समावेश आहे. उन्हाळ्यात झाडाला पाण्याचा ताण बसल्यास पुढे फळधारणेवर परिणाम होतो. त्यामुळे आहे त्या उपलब्ध जलसाठ्यावर फळबागांचे चांगल्याप्रकारे व्यवस्थापन करता येते.
कुजलेले शेणखत खोडाजवळ टाकल्याने..
काही शेतकऱ्यांच्या पाच ते दहा वर्षांच्या जुन्या फळबागा आहेत. पुढील काळात पाणी उपलब्ध न झाल्यास, या फळबागा वाळून मेहनत वाया जाऊ शकते. कुजलेले शेणखत खोटाजवळ टाकले जर माती पाणी धरून ठेवते शेणखत टाकल्यानंतर त्या झाडाला खोडाभोवती जैविक आच्छादन करता येईल. त्यासाठी उसाचे पाचट हा उत्तम पर्याय आहे.
ठिबक सिंचनाचा पर्यायही चांगला
पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असून, ठिबक सिंचनाचा पर्यायही योग्य आहे. ठिबक सिंचनामुळे, तसेच झाडाला हवे तसे पाणी मिळते. त्यामुळे वाढत्या उन्हात पिकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे, त्यांना फळबागा जगविण्यास मदत होणार आहे.
झाडाच्या खोडाभोवती करा पालापाचोळ्याचे आच्छादन
यासोबत गव्हाच्या काड्या, भाताचा पेंढा, शेतातून काढलेले तण. पालापाचोळा वापरून झाडाच्या खोडाभोवती पाच ते सहा इंच जाडीचा थर एक चांगले आच्छादन तयार करू शकतो. यामुळे दिवसभर कडक उन्हामुळे जे जमिनीतून बाष्पीभवन होते त्याचे प्रमाण खूप कमी होते. माती पाणी धरून ठेवते, फळलागवड नंतर उत्पादनात वाढ होते.
उन्हाळ्यात उन्हाचा झळा पिकांना लागतात. त्यामुळे फळं काळी पडणे, फळावर उन्हाचे डाग पडणे आणि बाष्पीभवनाचे प्रमाण वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यासाठी शेताच्या चारही बाजूंनी हिरव्या शेडनेटचा किंवा जुन्या साड्यांचा वापर करून आच्छादन घातले जाऊ शकते. फळझाडांचे उन्हाचा झळा लागण्यापासून संरक्षण करता येते. यंदा पाऊस कमी असल्याने टंचाईची दाहकता वाढली आहे. त्यातच पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेली फळबाग कशी जपायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.