Join us

तुमच्या ज्वारीवरही झालाय का लष्करी अळीचा प्रादूर्भाव? काय कराल उपाय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 11:00 AM

ही अळी ज्वारीची पाने कुरतडून फस्त करीत असल्यामुळे ज्वारीचे पीक धोक्यात

महाराष्ट्रात मागील दोन ते तीन वर्षांपासून अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होतानाचे चित्र आहे. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील काटी मंडळ कृषी कार्यालयांतर्गत २२ गावच्या शिवारात रब्बी हंगामातील ज्वारीची नऊ हजार हेक्टरवर पेरणी झाली. परंतु, पेरणीनंतर वाढीस लागलेल्या ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्यामुळे ज्वारीचे पीक धोक्यात येण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

यंदाचा खरीप अन् रब्बी हंगामही बळीराजासाठी संकटाचा ठरला आहे. खरिपात पावसाअभावी सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट झाली. हे नुकसान सहन करीत हलक्याशा ओलीवर रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी केली. परंतु, पावसाअभावी तीही संपूर्ण क्षेत्रात होऊ शकली नाही. या मंडळांतर्गत शिवारात ५० ते ६० टक्केच रब्बीची पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

मक्यावर अमेरिकन लष्करी अळी आली आहे? कसे कराल व्यवस्थापन

कीटकनाशकाची फवारणी करा

धाराशीव या भागात मका पिकानंतर लष्करी अळीने ज्वारी पिकावर अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रादुर्भाव झालेल्या ज्वारी प्लॉटवर कृषी कर्मचाऱ्यांचा सल्ला घेऊन कीटकनाशक औषधाची फवारणी करून घ्यावी. - आनंद पाटील, मंडळ कृषी अधिकारी

पावसाळ्यात पावसाने हुलकावणी दिल्याने रब्बी हंगामाची पेरणी हलक्या ओलीवर करण्यात आली आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारी पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही लष्करी अळी ज्वारीची पाने खाऊन फस्त करीत आहे. त्यामुळे ज्वारीचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे खरिपापाठोपाठ आता रब्बी हंगामही शेतकऱ्यांना नुकसानीचा ठरत आहे. - भास्कर पवार, शेतकरी, ताम लबाडी

दरम्यान, नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली असून, पेरणीनंतर वाढीस लागलेल्या ज्वारीवर आता लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही अळी ज्वारीची पाने कुरतडून फस्त करीत असल्यामुळे ज्वारीचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

टॅग्स :ज्वारीशेतकरीपाऊसरब्बी