बीड जिल्ह्यात गतवर्षीच्या पेरणी अहवालानुसार ३१ ऑगस्ट २०२३ रोजी १ लाख ८६ हजार मेट्रिक टन चारा शिल्लक आहे. तो अंदाजे ४३ दिवस पुरणार होता. चाऱ्याची उपलब्धता पाहता, भविष्यात टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध असणाऱ्या चाऱ्याची परजिल्ह्यात विक्री करू नये.
जिल्ह्याबाहेरील निविदाधारकांना लिलाव देण्यात येऊ नये. परजिल्ह्यात चारा वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे. चारा वाहतूक करताना आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती बीडीओ राजेंद्र गर्जे यांनी दिली.
जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात १ लाख २७ हजार मोठी, तर १ लाख ५ हजार छोटी जनावरे आहेत. तालुक्यातील शेतकरी वर्गाचा प्रमुख व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. मध्यंतरीच्या काळात दुधाचे भाव कोसळल्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची दूध व्यवसाय करण्याची मानसिकता संपली होती. मात्र अध्याप ही काही बहुतांशी दूध व्यवसाय करणारे शेतकरी असल्याने चार्याची मागणी आहे.
येथून पुढे नवीन चारा उत्पादित होईपर्यंत चाराटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आष्टी तालुक्यातील उत्पादित होणारा किंवा सद्यःस्थितीत असणारा सर्व प्रकारचा वाळलेला व ओला चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास मनाई आहे.
शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी
तालुक्यात चेक पोस्ट
• तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याने आपला चारा परजिल्ह्यात विकू नये. आपल्याच तालुक्यात टंचाई परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात लागणार आहे.
• परजिल्ह्यात चाऱ्याची वाहतूक होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी चेक पोस्ट ठेवण्यात आले आहेत. असे असतानाही कोणी चाऱ्याची वाहतूक करताना आढळून आल्यास त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
• चाऱ्याची परजिल्ह्यात वाहतूक करू नये, असे आवाहन तहसीलदार प्रमोद गायकवाड, गटविकास अधिकारी राजेंद्र गर्ने, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मंगेश ढेरेसह कर्मचाऱ्यांनी केले.