२१ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून साजरा केला जातो, संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ रोजी वन दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला व २१ मार्च २०१३ रोजी प्रथम आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला.
देशात वनक्षेत्र ३३ टक्के असणे गरजेचे असून, सध्या आपल्या देशात २४.६२ टक्के वनक्षेत्र असून अजून आपल्याला फार मोठी मजल गाठायची आहे. त्यासाठी सर्वांनीच निष्ठापूर्वक प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे.
आजच्या युगात आपण विकासाकडे झेप घेत असताना मानवाच्या व पृथ्वीच्या पर्यावरण सुरक्षिततेसाठी व संरक्षणासाठी आपण पुरेसे जागृत आहोत काय? वनांचा मानवी जीवनाशी असलेला दूढ संबंध त्यावर असलेले जीवसृष्टीचे अवलंबित्व वनांची असलेली गरज, जैवविविधतेचे संतुलन राखण्यासाठी हवा, पाणी, वायू, अन्न यांची शुद्धता यासाठी वनांचा विकास व संवर्धन संरक्षण अत्यंत गरजेचे आहे.
वनांपासून मानवाला जीवसृष्टीला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसोबत आयुर्वेदिक वनौषधींची, इंधन, कारखान्यांसाठी कच्च्या माल व त्या अनुषंगाने उपजीविकेची साधने व रोजगार निर्मितीमधून आर्थिक उन्नती साधता येते.
वने कार्बन शोषक असतात. पृथ्वीवरील उत्सर्जित १२ ते १८ टक्के कर्ब वायूचे शोषण करून ग्लोबल वॉर्मिंग परिणामाच्या नियंत्रणाचे काम करतात. वनांमुळे जमिनीची धूप रोखण्यासाठी मदत तर होतेच, पण जमिनीची सुपीकता वाढते व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
वनांमुळे प्राणी, पक्षी, कीटक यांना संरक्षण मिळते, शेतीवरील विविध रोग, किडींना रोखण्याचे काम वनांमुळे होते. त्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते. जगभरात वनांच्या क्षेत्रात घट नोंदवली जात असताना इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०२१ नुसार वर्ष २०१९ च्या तुलनेत आपल्या देशात वन व वृक्षांच्या आवरण क्षेत्रात २,२६१ वर्ग किलोमीटर वाढ नोंदविण्यात आली आहे.
सध्या आपल्या देशात २४.६२ टक्के वन क्षेत्र असून अजून आपल्याला फार मोठी मजल गाठायची आहे. त्यासाठी सर्वांनीच निष्ठापूर्वक प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे.
आवरण क्षेत्रात २२६१ वर्ग किलोमीटर वाढ ■ २१ मार्च २०१३ रोजी प्रथम आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा■ देशात वनक्षेत्र ३३ टक्के असणे गरजेचे असून, सध्या आपल्या देशात २४.६२ टक्के वनक्षेत्र आहे.■ इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०२१ नुसार वर्ष २०१९ च्या तुलनेत आपल्या देशात वन व वृक्षांच्या आवरण क्षेत्रात २,२६१ वर्ग किलोमीटर वाढ नोंदविण्यात आली आहे.
वनांच्या वाढीसाठी आपण वृक्षारोपण करणे, वृक्षांची जोपासना करणे, वणवे रोखणे, अवैध जंगल तोडीला आळा घालणे, वन जमिनीवरील अतिक्रमण रोखणे यासाठी समाजात जागृती अभियान, सावधानता, संवर्धन व सक्रिय सहभाग करून घेणे गरजेचे आहे. आपल्या पुढील पिढीला निरामय अन्न, आरोग्य उपलब्ध करून देण्यात पण प्रयत्नपूर्वक हा निसर्ग, वने, पर्यावरण टिकवले पाहिजे, वाढवले पाहिजे, तरच मानवजात सुरक्षित राहील. - शारदा राजगुरव, पर्यावरण अभ्यासक