राज्यात सर्वांत जास्त दुग्धोत्पादन होणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने समन्वय साधून काम केल्यास विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात रब्बी हंगामाचे नियोजन व्यवस्थित होऊन रब्बी हंगाम यशस्वी होईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी विभागाच्या समन्वयाने रब्बी हंगाम नियोजन चर्चासत्र २०२३-२४ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अनुप कुमार बोलत होते. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी.जी. पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे, शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, नियंत्रक सदाशिव पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के व अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी प्रास्ताविक, तर डॉ. चिदानंद पाटील यांनी स्वागत केले.सूत्रसंचालन संशोधन उपसंचालक डॉ. बाळासाहेब पाटील यांनी, तर आभार सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ यांनी मानले.